वॉशिंग्टन : देशातील करोना स्थितीबाबत अमेरिकेतील व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून देशव्यापी टाळेबंदी लावण्याची सूचना केली आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, भारतात देशव्यापी टाळेबंदीची गरज असून मोठय़ा प्रमाणावर तात्पुरती रुग्णालये उभारण्यात यावीत, त्याच्या जोडीला लसीकरण मोहिमेलाही वेग देण्याची गरज आहे. संसर्गजन्य रोग क्षेत्रात तज्ज्ञ मानल्या जाणाऱ्या फौची यांनी सांगितले की, भारतातील परिस्थिती गंभीर आहे हे आता सर्वाना कळून चुकले आहे. जेव्हा जास्त लोकांना संसर्ग होत असतो तेव्हा त्यांची पुरेशी काळजी घेणेही गरजेचे असते. रुग्णालयात खाटा व प्राणवायूची कमतरता असेल, तर ती अतिशय दयनीय स्थिती म्हणावी लागेल. त्यामुळेच आम्ही भारताला मदतीसाठी तत्पर आहोत.

फौची यांनी सांगितले की, भारताने सर्वप्रथम जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण सुरू केले पाहिजे. भारताने दोन लशी तयार केल्या आहेत, त्याशिवाय त्यांनी अमेरिका, रशिया या सारख्या देशांकडून लशी खरेदी कराव्यात. असे असले तरी लसीकरणानेही हा प्रश्न सुटणार नाही. तो काही आठवडय़ांपुरता सुटेल. भारतात लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रमाणात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. भारताने संपूर्ण टाळेबंदी लागू केली तरच हा प्रश्न सुटू शकेल. गेल्या वर्षी चीनने तेच केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इतर देशांनी मर्यादित प्रमाणात का होईना टाळेबंदी केली. तुम्हाला त्यासाठी सहा महिने टाळेबंदीची गरज नाही केवळ काही आठवडे टाळेबंदी केली तरी त्याचा परिणाम दिसून येईल. टाळेबंदीमुळे विषाणूच्या प्रसाराला अटकाव होत असतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे.  त्यामुळे संसर्गाची साखळी तुटते.