गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर राज्य प्रशासन सतर्क झालं आहे. पण त्यांनी उचललेलं पाऊल पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुतळ्यांची विटंबना करणा-यांविरोधात कारवाई करायचं सोडून प्रशासनाने अजब मार्ग निवडला असून बदायू शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पिंज-यात बंद करुन टाकलं आहे. कोतवाली शहरातील गद्दी चौकात आंबेडकरांचा हा पुतळा आहे.

बाबासाहेबांच्या पुतळ्याला फक्त पिंज-यात बंद करण्यात आलेलं नाही, तर त्याला टाळंही ठोकण्यात आलं आहे. यासोबत येथे होमगार्डही तैनात करण्यात आला आहे. २४ तास पुतळ्याची सुरक्षा केली जात असून यासाठी तीन कर्मचा-यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस अधिकारी विरेंद्र सिंह यादव यांनी आपल्याला यासंबंधी माहिती नसल्याचं सांगितलं आहे. पुतळ्याच्या सुरक्षेसाठी कोणीतरी हा पर्याय निवडला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. यासंबंधी तपास केला जाणार आहे.

बदायूचे उपविभागीय दंडाधिकारी पारसनाथ मौर्य यांनी १४ एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्याने सर्व पुतळ्यांना विशेष सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला आहे. काहीजण पुतळ्यांचं नुकसान करत सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील अशी शंका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

याआधी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत अशी एक घटना समोर आली होती. लखनऊच्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात पुतळ्याच्या सुरक्षेसाठी त्याच्याभोवती कुंपण घालण्यात आलं होतं. याआधी उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद, आजमगडसहित अनेक ठिकाणी पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता.