लखनऊ : अलिगढ मुस्लीम विद्यापीठात (एएमयू) सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून डॉ. काफील खान यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (रासुका) कारवाई केली आहे.

डॉ. खान यांची शुक्रवारी कारागृहातून सुटका होणार होती, मात्र त्यांच्यावर रासुकान्वये कारवाई करण्यात आल्याने त्यांना कारागृहातच राहावे लागणार असून त्यांच्यापुढील अडचणी आता वाढणार आहेत. डॉ.  खान यांनी उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने २९ जानेवारी रोजी मुंबईतून अटक केली होती.

डॉ. काफील खान यांनी १२ डिसेंबर रोजी एएमयूमध्ये सीएएविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, काफील खान यांना द्वेष पसरविणारे भाषण केल्याने अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

गोरखपूर येथील मुलांच्या मृत्युप्रकरणी आपण निर्दोष मुक्त झालो आहोत, आता पुन्हा आपल्याला आरोपी बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे, आपल्याला महाराष्ट्रातच राहू द्यावे अशी विनंती आपण महाराष्ट्र सरकारला करीत आहोत, उत्तर प्रदेश पोलिसांवर आपला विश्वास नाही, असे काफील खान यांनी म्हटले होते.