गोरखपूर येथील बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यू प्रकरणात तत्काळ उपचार करुन अनेकांचे जीव वाचवल्याने हिरो ठरलेले डॉ. काफील खान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून त्यांचा वापर स्वतः खासगी रुग्णालयासाठी केल्याचे या आरोपांत म्हटले आहे. या प्रकरणी एक अहवाल तयार करण्यात आला आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. खान यांना बीआरडी रुग्णालयाच्या बालरोगचिकित्सा विभागातून निलंबितही करण्यात आले आहे. त्यांच्याकडील रुग्णालयातील सर्व जबाबदाऱ्याही काढून घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणी डॉ. राजीव मिश्रा यांनी देखील डॉ. खान यांना या प्रकरणी साथ दिल्याचा आरोप आहे.

अहवालातील माहितीनुसार, मेंदूज्वर विभागाचे प्रमुख असलेले डॉ. खान यांना १२ ऑगस्टच्या रात्री रुग्णालय प्रशासनाकडून दुर्घटनेबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली. मात्र, या प्रकरणी रुग्णालयाच्या नोडल अधिकाऱ्यांना आपल्या रुग्णालयात आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याबाबतची माहिती कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आलेली आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे, बीआरडी रुग्णालयाच्या भितींवर डॉ. खान यांच्या खासगी रुग्णालयाची जाहीरात लावण्यात आल्याचे आढळून आले आहे. यामध्ये डॉक्टर सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उपलब्ध असतील असे लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर डॉ. काफील खान हे या रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांच्या साठा आणि पुरवठा विभागाचे सदस्यही होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ९ ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्यावेळी केवळ डॉ. काफील खान हे त्यांना रुग्णालयाची माहिती दिली. मात्र, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत तसेच याच्या थकीत बिलाबाबत माहिती दिली नाही, असे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मात्र, ११ ऑगस्ट रोजी ज्यावेळी रुग्णालयातील परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यावेळी डॉ. खान यांनी तातडीने स्वतः खासगी रुग्णालयातील तीन ऑक्सिजन सिलिंडर्स वैद्यकीय महाविद्यलयात पाठवून दिले आणि आपण ते खरेदी केल्याचे सांगितले होते.

अहवालानुसार, डॉ. काफील खान आणि बीआरडी महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पुर्णिमा शुक्ला हे रुग्णालयातील ६८ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.