देशात शहरांची रस्त्यांची नावं बदलण्याची मोठी मोहीम सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं काही शहरांची नाव बदलून टाकली. तर महाराष्ट्रातही औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. पण, भाजपाचं सरकार असलेल्या गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी थेट फळाचं बारसं केलं आहे. ड्रॅगन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचं रुपाणी यांनी नामाकरण केलं असून, गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रूट कमलम (कमळ) या नावानं ओळखलं जाणार आहे.

देशात आणि जगभरात ड्रॅगन फ्रूट नावानं प्रसिद्ध असलेलं फळ गुजरातमध्ये कमलम म्हणून ओळखलं जाणार आहे. “फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं सांगण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.

चिनी ड्रॅगन फ्रूट आता गुजरातमध्ये कमलम नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातमधील कच्छ आणि नवसारी या भागात शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात. या भागात मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जातं. दरम्यान, गुजरातच्या वन विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्यासाठीही याचिका केलेली आहे. ड्रॅगन फ्रूट हे फळ कमळासारखं दिसते आणि शेतकरीही या फळाला कमळ फळ म्हणून ओळखू लागले आहेत. त्यामुळे या फळाला कमळ नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडून कण्यात आलेली आहे.

कृषी संशोधन परिषदेकडे विनंती केलेली असतानाच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नावाची घोषणा केली. कोणत्याही फळाला ड्रॅगन हा शब्द वापरणं योग्य नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे या फळाचं नाव कमलम करण्यात आलं आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाचं नवं नामकरण गुजरात पुरतंच मर्यादित असणार आहे. योगायोग म्हणजे भाजपाच्या प्रदेश मुख्यालय असलेल्या कार्यालयाचं नावही कमलमच आहे.