जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्याने सुरक्षा जवानांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. दहशतवाद विरोधी मोहीम सुरु असताना नाट्यमय घडामोडींनंतर दहशतवाद्याने आत्मसमर्पण केल्याचा व्हिडीओ भारतीय लष्कराने शेअर केला आहे. २० वर्षांचा हा तरुण काही दिवसांपूर्वीच दहशतवादाकडे वळला होता. त्याच्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे.

भारतीय लष्कराने शेअर केलेल्या व्हिडीओत एक जवान झुडपांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्याशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. जहांगीर भट अशी या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. काही वेळाने दहशतवादी हात वर करुन आत्मसमर्पण करण्यासाठी येताना दिसत आहे. यावेळी जवान सोबत अजून कोणी आहे का? शस्त्र आहे का ? अशी विचारणा करत आहे. तसंच आपल्या सहकाऱ्यांना “कोणीही गोळी चालवणार नाही” असं सांगत आहे.

“तुला काहीही होणार नाही मुला,” असं जवान दहशतवाद्याला सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. आत्मसर्पण केल्यानंतर जवान सहकाऱ्यांना त्याला पिण्यासाठी पाणी देण्यास सांगत असल्याचंही ऐकू येत आहे.

भारतीय लष्कराने अजून एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तरुणाचे वडील आपल्या मुलाला वाचवल्याबद्दल आभार मानताना दिसत आहेत. “पुन्हा त्याला दहशतवाद्यांसोबत जाऊ देऊ नका,” अशी विनंती ते जवानांकडे करत आहेत. तरुणाला सुरक्षित आणि जिवंत पकडल्याबद्दल अधिकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, “१३ ऑक्टोबर रोजी विशेष पोलीस अधिकारी दोन एके-४७ घेऊन फरार झाल्याची माहिती मिळाली होती. त्याच दिवशी जहांगीर भट बेपत्ता झाला होता. कुटुंब त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. आज सकाळी संयुक्त मोहिमेदरम्यान हा तरुण आढळला. प्रोटोकॉलप्रमाणे लष्कराने त्याने आत्मसमर्पण करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यश मिळालं”.