संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने शुक्रवारी ५०० किलो वजनाच्या इनर्शिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने डीआरडीओचे हे महत्वपूर्ण यश आहे.

संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा हा गाईडेड बॉम्ब डीआरडीओने विकसित केला आहे. या गाईडेड बॉम्बने ३० किलोमीटरवरील लक्ष्याचा अत्यंत अचूक वेध घेतला. दोन महिन्यांपूर्वी डीआरडीओने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अत्यंत मोजक्या देशांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

भारताच्या आधी चीन, रशिया आणि अमेरिका या देशांनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. या चाचणीद्वारे भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत कठीण समजले जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले होते.