मेघालयात गेल्या पाच वर्षांत ४६३ बळी

दारू पिऊन आणि बेदरकारपणे वाहने चालविण्यात आल्यामुळे मेघालय राज्यात ठिकठिकाणी ४००हून अधिक जण ठार झाले असून १,७००हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अलीकडेच संपलेल्या मेघालयच्या राज्य विधिमंडळ अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री रोशन वाज्री यांनी यासंबंधीचा अहवाल सादर केला.
दारू पिऊन वाहने चालविण्यात आल्यामुळे सन २०१० ते २०१४ या कालावधीत ४६३ जणांनी आपला जीव गमावला तर १,७७२ लोक अशाच अपघातांमध्ये जखमी झाले. २०१० मध्ये ९४ जण ठार तर २७४ लोक जखमी झाले. २०११ मध्ये ९२ लोक मृत्युमुखी पडले तर ३९४ जण जखमी झाले. सन २०१२ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ९२ व ३११ होती. सन २०१३ मध्ये ८९ लोक मृत्युमुखी तर ४०२ जण जखमी झाले. २०१४ मध्ये हीच संख्या अनुक्रमे ९६ व ३९१ होती, असे वज्रा यांनी सांगितले. दारू पिऊन वाहने चालविल्याबद्दल याच कालावधीत ५५७ चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महामार्गावरील परवानाधारक दारू दुकानदारांना त्यांची दुकाने महामार्गापासून २०० मीटर लांब अंतरावर हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ही प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज असल्याचे वज्रा यांनी सांगितले.