मध्यरात्री मोकळ्या जागी गाडी पार्क करायची नी घरी जाऊन झोपायचं असा विचार दिल्लीमधल्या मिनी ट्रकचा चालक विजेंदर राणा यांनी केला होता. परंतु गाडी पार्क करताना त्यांचा शेजाऱ्यांच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्र्याला किंचित धक्का लागला. हे शेजारी रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. अवघ्या काही मिनिटांनी राणा त्यांच्या घरी असायला हवे होते, परंतु ते तिथं रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात होते. कारण, त्यांनी कुत्र्याची माफी मागायला नकार दिला आणि त्याच्या मालकांनी राणावर स्वयंपाकघरातल्या चाकुने सहा वार केले. हा गोंधळ ऐकून विजेंदर यांचा मोठा भाऊ राजेश त्याच्या मदतीला धावले त्यांच्यावरही तीन वार करण्यात आले.

दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आले. परंतु दोन मुलांचा पिता असलेल्या विजेंदर यांचा जीव गेला तर राजेश हे उपचार घेत आहेत. दिल्लीतल्या मोहन गार्डन भागात हा प्रकार घडला. अंकित व पारस हे मुख्य संशयित आरोपी असून त्यांचा भाडेकरू देव चोप्रा हा देखील सहआरोपी आहे. टॉमी या कुत्र्याला घेऊन तिघं मध्यरात्रीच्या सुमारास बाहेर फिरायला पडले होते. त्यानंतर दहाच मिनिटात विजेंदर गाडी घेऊन आला आणि ती पार्क करताना गाडीचा टॉमीला धक्का लागला.

या तिघांनी त्याला पकडलं आणि टॉमीची माफी मागण्यास सांगितलं. विजेंदरने त्यास नकार दिला व टॉमीकडे लक्ष ठेवा असा सल्ला दिला. यानंतर तिघांनी त्याला मारहाण केली व स्वयंपाकघरातून चाकू आणून विजेंदरला व त्याच्या मदतीला आलेल्या त्याच्या भावाला भोसकले.