जम्मू : जम्मू जिल्ह्याच्या सीमावर्ती क्षेत्रात जम्मू-काश्मीर पोलिसांनी गोळीबार करून एक ड्रोन पाडले. हे ड्रोन सुमारे पाच किलो इतके स्फोटक द्रव्य वाहून नेत होते. ही स्फोटके आयईडी (सुधारित स्फोटक साधन) बनविण्यासाठी वापरली जातात.

गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या कनाचक पट्ट्यात एक ड्रोन उडत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांचे शीघ्र कृती दल तेथे पोहोचले. त्यांनी ड्रोनविरोधी रणनीतीचा अवलंब करीत केलेल्या गोळीबारात हे ड्रोन खाली पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ड्रोन भारतीय हद्दीत सात ते आठ किलोमीटर आत आले होते. ते सहा मोठे पंख असलेले टेट्राकॉप्टर होते.

कल्याणसिंह यांची प्रकृती गंभीर

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची प्रकृती गंभीर असून त्यांना कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आल्याची माहिती शुक्रवारी संजय गांधी आयुर्विज्ञान पदव्युत्तर संस्थेतर्फे देण्यात आली.  तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ८९ वर्षीय कल्याणसिंह यांना ४ जुलै रोजी संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याआधी त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार करण्यात आले.