News Flash

‘राम रहिम दोषी असूच शकत नाहीत’, अनुयायांचा आक्रमक पवित्रा, हिंसाचारात ३० जण ठार तर २५० जखमी

दिल्ली आणि पंजाबमध्येही डेरा सच्चाच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ आणि तोडफोड

पंचकुला या ठिकाणी उसळलेला हिंसाचार

हरयाणातील पंचकुलामध्ये आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानंतर पंचकुलामध्ये कमालीचा तणाव बघायला मिळतो आहे. डेरा सच्चा सौदाचे हजारो समर्थक आधीपासूनच पंचकुलामध्ये तळ ठोकून बसले होते.

आज सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहिम यांना दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात ३० जण ठार झाले आहेत तर २५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वेबसाईटने दिले आहे. डेरा सच्चाच्या प्रमुखांकडून चूक होऊच शकत नाही असा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता हिंसक वळण लागलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत डेरा सच्चाच्या १ हजार अनुयायांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बलात्कार आणि लैंगिक शोषण या प्रकरणात बाबा राम रहिम यांना किमान ७ वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्याचमुळे पंचकुलातील वातावरण तापले आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून आणि सैन्यदलांकडून अश्रूधुराचा मारा करण्यात आला आहे, मात्र हे आंदोलन अजूनही सुरूच आहे अशी माहिती मिळते आहे.

डेरा सच्चा सौदाच्या कार्यकर्त्यांनी एक पेट्रोल पंप जाळला आहे, त्याचप्रमाणे रस्त्यावर उतरूनही त्यांनी तोडफोड सुरू केली आहे. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधील रस्त्यांवरही आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुढील ७२ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टर यांच्या माध्यमातूनही पंचकुलाची पाहणी करण्यात येते आहे.

हरयाणातील आनंद विहार रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या रेवा एक्स्प्रेसचे दोन रिकामे डबे डेरा सच्चाच्या कार्यकर्त्यांनी जाळले आहेत. तिथल्याच एका मॉललाही आग लावण्यात आली आहे. पंचकुलात जे काही नुकसान डेरा सच्चाच्या कार्यकर्त्यांकडून होतं आहे त्याची नुकसान भरपाई ही डेरा सच्चा सौदाकडूनच वसुल केली जाणार आहे असं न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीतही दोन रिकाम्या बसेल जाळल्याची घटना समोर आली आहे.

राम रहिम यांच्या सुनावणीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांची वाहनेही फोडण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 6:15 pm

Web Title: drones helicopters carry out aerial survey in panchkula
Next Stories
1 रोहित वेमुला मृत्यूप्रकरण : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘रुपनवाल समिती’चा अहवाल जाळला
2 सुनावणीवेळी हात जोडून उभे होते राम रहिम
3 वैयक्तिक गोपनीयतेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील गोमांसबंदी रद्द होणार?
Just Now!
X