नोटाबंदीमुळे मुलींच्या तस्करीत घट झाली असून वेश्या व्यवसायाला आळा बसला, असे केंद्रीय कायदा आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि देशातील इतर भागांमधील मुलींची देशातील महानगरांमध्ये तस्करी केली जायची. मात्र, नोटाबंदीनंतर या तस्करीला मोठा धक्का बसला. त्यामुळे वेश्या व्यवसायात घट झाली, असे प्रसाद यांनी म्हटले.

‘आधी बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील मुलींची तस्करी केली जायची. यासाठी केले जाणारे व्यवहार रोख रकमेच्या माध्यमातून केले जायचे. मात्र, नोटाबंदीनंतर या व्यवहारांना मोठा फटका बसला. त्यामुळे वेश्या व्यवसायाला आळा बसण्यास मदत झाली,’ असा दावा प्रसाद यांनी केला. नोटाबंदीमुळे सुपारी देऊन घडवून आणले जाणारे गुन्हेदेखील घटले, असेही ते म्हणाले. याशिवाय काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना, नक्षलवादी कारवायांचे प्रमाणही कमी झाले, असे प्रसाद यांनी म्हटले. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘भारताला एक प्रामाणिक देश बनवणे हे नोटाबंदीचे उद्दिष्ट होते,’ असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. यावेळी त्यांनी आधीच्या सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसने भ्रष्टाचारासाठी एकही कोपरा सोडला नाही. त्यांच्या सत्ताकाळात सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला होता, अशी टीका प्रसाद यांनी केली. नोटाबंदीचा फटका गरिबांना बसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला प्रसाद यांनी उत्तर दिले. ‘नोटाबंदीमुळे सामान्य माणूस आनंदी आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने अनेक योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे,’ असेही ते म्हणाले.

नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर तोफ डागणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या टीकेवरही प्रसाद यांनी भाष्य केले. ‘राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल किती माहिती आहे, हा वादविवादाचा विषय होऊ शकतो,’ अशा शब्दांमध्ये प्रसाद यांनी राहुल गांधींना टोला लगावला. राहुल गांधी यांचे काँग्रेस पक्षातील स्थान हे घराणेशाहीमुळे आहे. त्यांना हे स्थान त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर मिळालेले नाही, अशी टीका त्यांनी केली.