दहशतवाद दुसऱ्यांचा प्रश्न आहे असून, त्यांच्यासाठी दहशतवादी असलेला माझ्यासाठी दहशतवादी नाही. हा समज आता मोडीत काढण्याची वेळ आली आहे. ब्रसेल्समधील हल्ल्यांमुळे आण्विक सुरक्षेला मोठा धोका असल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकमेकांना सहकार्य करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये केले.
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभावेळी मोदी यांनी दहशतवादाच्या जागतिक धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. वॉशिंग्टनमध्ये आजपासून दोन दिवसीय आण्विक सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
मोदी म्हणाले, दहशतवादाचे जाळे जागतिक स्वरुपाचे असले तरी आपण सर्वजण देशपातळीवर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. दहशतवाद्यांची पोहोच बघितल्यावर जागतिक पातळीवर सर्व देशांमध्ये एकमेकांना पुरेसे सहकार्य होत नसल्याचे दिसते. या स्थितीत आण्विक सुरक्षा हा प्रत्येक राष्ट्रासाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक देशानेच या संदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कारवाया करताना दहशतवादी २१ व्या शतकातील तंत्रज्ञान वापरताना दिसतात. पण त्यांना देशाकडून मिळणारे उत्तर अजून जुन्या स्वरुपाचे आहे. त्याचाही विचार केला पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले आहे.