दहा राज्यात दुष्काळ जाहीर, २५६ जिल्ह्य़ांचा समावेश
देशात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असून त्याबाबत सरकार संवेदनशील आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले.
ते म्हणाले की, दहा राज्यात दुष्काळ जाहीर केला असून त्यात २५६ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला असून महाराष्ट्रात स्थिती भीषण आहे. दीर्घकालीन उपायांवर आमचा भर असून जलसंवर्धनावर भर असणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नदी जोड प्रकल्प व इतर कार्यक्रम राबवले जात आहेत. राज्यांना दुष्काळासाठी निधी दिला आहे, अजूनही मदत केली जाईल. पाणी मौल्यवान आहे व भारतात जगातील १७ टक्के लोकसंख्या असून एकूण जलसाधनांपैकी ४ टक्के भारतात आहेत.
वधवानी फाउंडेशनशी करार
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व वधवानी ऑपरेटिंग फाउंडेशन यांच्यातील समझोता कराराला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. देशातील युवकांमध्ये कौशल्य क्षमता निर्माण करण्यासाठी तसेच त्यासाठी अनुकूल स्थिती तयार करण्यासाठी वधवानी फाउंडेशन मदत करणार आहे. उद्योजकता विकास व बहुकौशल्य कार्यक्रमात वधवानी फाउंडेशन ३ ते ४ कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च करणार आहे. केंद्र एकूण करणार असलेल्या खर्चाच्या ही दहा टक्के रक्कम आहे.
तिरूपतीला आयसर सुरू
आंध्र प्रदेशात तिरूपती येथे इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेची शाखा श्री रमा अभियांत्रिकी महाविद्यालयात तात्पुरती सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सुरुवातीच्या तीन वर्षांत १३७.३० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
कृषी विद्यापीठास जमीन
सरकारने हैदराबाद येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाला २१.९३ एकर जमीन देण्यास मान्यता दिली असून राजमुंद्री येथे या जमिनीवर कृषी विद्यापीठ उभारणार आहे. २००८-०९ मध्ये हे कृषी महाविद्यालय सुरू केले असून सध्या ते भाडय़ाच्या जागेत सुरू आहे.

वनीकरण विधेयकात बदल
सरकारने वनीकरण विधेयकात बदल केले असून त्यानुसार वनजमिनींसाठी दिलेले व खर्च न केलेल्या ४० हजार कोटी रुपये रकमेचा वापर पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. संसदेत हे विधेयक २५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.