यंदा ‘एल निनो’ घटकाने दाखविलेल्या प्रतापाचा तडाखा देशभरातील पावसाला बसला आणि आता जून महिना संपल्यानंतर ४५ टक्के पाऊस कमी पडला असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात असले तरी या आकडेवारीत फारसा रस नसलेला बळीराजा आणि सामान्य माणूसही पावसाचे आगमन लांबल्यामुळे चांगलाच हवालदील झाला आहे. आता जुलै महिना उजाडला आणि तरीही पाऊस येण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाऊस येण्याच्या तारखा जवळ येत असल्या तरी देशभरात एकूणच पावसाची अवस्था भीषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरातील विविध राज्यांच्या एकूण दुष्काळस्थितीचा आढावा..
एल निनो आणि नानौक नावाच्या वादळाने भारतातील मान्सूनचा पहिला महिना तरी कोरडा घालवला आहे. त्यामुळे देशात नेहमीपेक्षा या महिन्यात ४५ टक्के पाऊस कमी पडला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत कुणालाच पावसाची चिंता पडली नव्हती. पण आता पावसाशिवाय ‘अच्छे दिन कसे येणार’, असा खरा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासक म्हणून पहिली कसोटी दुष्काळाचा सामना करण्यात लागणार आहे. सरकारने भारतातील ५४० जिल्ह्य़ांपैकी ५०० जिल्ह्य़ांसाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली आहे. गेल्या वेळी बियाणे काळ्या बाजाराने विकली जात होती आता यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना खरेदी केलेली बियाणे फेकून द्यायची वेळ आली आहे.
कर्नाटक – या राज्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. एकूण ३० पैकी ३८ जिल्ह्यात १२५ तालुके दुष्काळग्रस्त आहेत.
ओडिशा –  १० ते १६ जून दरम्यान या राज्यात १७.२ मि.मी पाऊस झाला, हे प्रमाण सरासरीच्या ८१.५ टक्के कमी आहे. सरासरी प्रमाण ११५.५ मि.मी. आहे. पाऊस न झाल्याने ३० जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत.
पंजाब – मान्सूनचा पाऊस पहिल्याच महिन्यात सरासरीच्या साठ टक्के कमी पडल्याने भाताचे पीक धोक्यात आले आहे. १९८७ पेक्षा मोठा दुष्काळ तेथे शक्य आहे. तेथे सरासरीपेक्षा ६७ टक्के कमी पाऊस पडल्याने भारताचे धान्याचे कोठार मानल्या जाणाऱ्या पंजाबची स्थिती वाईट आहे.
गुजरात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात १०३ तालुक्यात पावसाने दगा दिला आहे. वीस धरणे अर्धी भरलेली आहेत. १५०-२०० खेडय़ात टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. गुजरातेत जूनच्या मध्याला मान्सूनचे आगमन होते पण यावेळी तसे झाले नाही. तेथे पावसाचा ८० टक्के तुटवडा आहे.
राजस्थान – या राज्यात सरासरीच्या ८० टक्के कमी पाऊस पडला असून जवळपास संपूर्ण राज्यच दुष्काळाच्या छायेत आहे असे म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्र – विधानसभा निवडणुकीला तोंड देणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्याच महिन्यात सरासरी ६६.२ मिमी पेक्षा कमी म्हणजे ३१.७ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ५२ टक्के कमी आहे. राज्यातील १०० धरणात २० टक्क्य़ांपेक्षा कमी पाणी आहे. ३५ जिल्ह्य़ांपैकी १८ जिल्ह्य़ात कमी पाऊस पडला आहे. खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून १२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रातील पेरणीला फटका बसला आहे.
मध्य प्रदेश – अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. पूर्व मध्य प्रदेशात ४१.९ मि.मी. ऐवजी ३२.३ तर पश्चिम मध्य प्रदेशात ३८.३ मि.मी. ऐवजी १९.९ मि.मी पाऊस पडला आहे. तेथील अनेक तालुके दुष्काळी जाहीर करण्याच्या स्थितीत आहेत. मध्य भारतातील ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग ही प्रमुख पिके  लागवडीच्या पातळीवरही नाहीत.

पावसाची स्थिती
* मध्य भारत सरासरी ६६.३ झालेला पाऊस ३१ मि.मी.
* दक्षिण द्वीपकल्प ८७.६  झालेला पाऊस ६४ टक्के
* वायव्य भारत २८.१ झालेला पाऊस १३.६ टक्के
*  ईशान्य भारत १९१.२ झालेला पाऊस १००.१ टक्के
* देश ७८.८ मि.मी झालेला पाऊस ४३.४ टक्के (तूट ४५)

कृषी क्षेत्र
१४% भारतीय कृषी क्षेत्र. कृषी अर्थव्यवस्था २ ट्रिलियन, अवलंबित्व-मान्सूनवर
२०१७
सध्याचा पाऊ स बघता प्रधानमंत्री सिंचन योजना २०१७ पर्यंत दहा पट वाढवली तरच शेतीला भवितव्य.