मद्यपान केलं असल्याने कारवाईच्या भीतीने पळून जाताना वाहनचालकाने एका पोलीस कर्मचा-याच्या अंगावर कार चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील ककिनाडा येथे ही घटना घडली. वाहतूक पोलीस नेहमीप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन करणा-यांविरोधात कारवाई करत असताना हा प्रकार घडला. वाहतूक पोलिसांना पाहताच कारवाई होईल या भीतीने मारुती सिलेरिओच्या कारचालकाने गाडी पळवण्यास सुरुवात केली आणि याचवेळी समोर आलेल्या पोलीस कर्मचा-याला चिरडलं आणि पळ काढला.

घटनास्थळी असणा-या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. व्हिडीओत वाहतूक पोलीस कारसमोर उभे राहून अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र कारचालक त्यांना न जुमानता कार पुढे घेऊन जातो. याचवेळी एक पोलीस कर्मचारी बॅरिकेट घेऊन कारसमोर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, पण कारचालक तिथेही न थांबता कार पोलीस कर्मचा-याच्या अंगावर चढवतो आणि अखेर पळ काढण्यात यशस्वी होतो. या दुर्घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.