पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी अर्थात डीएसके यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची मुदत आज संपल्यानंतरही डीएसके यांनी अद्याप पैसे जमा न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. दरम्यान, हायकोर्टाने ही मुदत वाढवून देण्यासही नकार दिला आहे. तसेच तपास अधिकारी त्यांची कारवाई करण्यास मोकळे आहेत, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

५० कोटी जमा करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा असा इशाराच मुंबई हायकोर्टाने यापूर्वीच डीएसकेंना दिला होता. हायकोर्टाच्या आदेशानुसार, १९ डिसेंबरपर्यंत डीएसकेंना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करायचे होते. मात्र, आजच ही मुदत संपली असून अद्याप त्यांनी पैसे भरलेले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.

हायकोर्टाने दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीवर सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला होता. १५ दिवस ही खूप मोठी मुदत असल्याचे सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितले होते. गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांची भरपाई या ५० कोटींमधून केली जाणार होती. या संदर्भातले प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करण्याचे आदेश डीएसकेंना देण्यात आले होते. तसेच जी संपत्ती विकता येईल त्याची यादीही देण्याचे आदेश देण्यात आले होते.

तीन हजार गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप डीएसकेंवर आहे. मात्र, आपण ठेवीदारांची कोणतीही फसवणूक केली नसून पैसे परत करणार आहोत, असे डीएसकेंनी म्हटले होते. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र डीएसके हे मराठी व्यावसायिक आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवले जात असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शवला होता.

पुण्यातील महत्वाकांक्षी ड्रीम सिटी प्रकल्पासाठी डीएसकेंनी गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटींच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. मात्र, हा प्रकल्प बारगळल्यानंतर गुंतवणूकदारांचे देणी परत न केल्याचा आरोप डीएसकेंवर ठेवण्यात आला आहे.