दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या एका २१ वर्षाच्या विद्यार्थ्याच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी इशरत अली या २५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. हत्या होण्याच्या दहा दिवस आधी डेटिंग अॅपवरुन या दोघांची भेट झाली होती असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी रात्री द्वारका सेक्टर १३ येथे नाल्याजवळ एका २१ वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटवताना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी दिल्ली विद्यापीठातील याच मुलाचे अपहरण झाल्याचे पोलिसांना समजले.

मृत मुलाची आरोपी इशरतबरोबर डेटिंग अॅपवरुन ओळख झाली होती. इशरत एका एक्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. मृत मुलगा इशरतला दहा दिवसात तब्बल तीनवेळा भेटला होता. हत्येच्या दिवशी दुपारी द्वारका सेक्टर १३ येथे एका हॉटेलमध्ये दोघे भेटले होते. २२ मार्चच्या रात्री काही कारणावरुन इशरतचे पीडित मुलाबरोबर भांडण झाले. संतापाच्याभरात डोक्यात हातोडा मारुन हत्या केल्याची कबुली इशरतने पोलिसांना दिली.

हत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याइतपत दोघांमध्ये नेमका काय वाद झाला त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर इशरते मुलाच्या वडिलांना खंडणीसाठी फोन केला. तपासाची दिशाभूल करण्यासाठी म्हणून त्याने या प्रकरणाला अपहरणाचा रंग देण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले. इशरतने मुलाच्या वडिलांना व्हॉटस अॅपवरुन फोन करुन ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली.