दुबई विमानतळावर आंबे चोरण्याच्या आरोपाखाली एका भारतीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवासी विमानात सामाना ठेवताना या व्यक्तीने एका बॉक्समधील दोन आंबे चोरले. ही व्यक्ती विमानतळावरील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर काम करणाऱ्या २७ वर्षीय भारतीय कर्चमाऱ्याने चुकून आपण ते आंबे चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. विमानतळावरील टर्मिनस तीनवर प्रवाशांचे समान विमानात ठेवण्याचे काम हा कर्मचारी करतो. ‘मला खूप तहान लागलेली. त्यामुळे मी समानामधील बॉक्स उघडून पाण्याची बाटली शोधत होतो. तितक्यात एका बॉक्समध्ये मला आंबे दिसल्याने मी ते चोरले आणि तहान भागवण्यासाठी खाल्ले,’ असं या कर्मचाऱ्याने पोलिसांना सांगितले. या आंब्यांची किंमत सहा दिऱ्हम (भारतीय चलनानुसार १०८ रुपये) इतकी होती. या कर्मचाऱ्याने याआधी २०१७ मध्येही अशाच प्रकारे एका बॉक्समधून फळे चोरुन खाल्ल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून रेकॉर्डवरुन समोर आली आहे. ‘२०१८ मध्येही पोलिसांनी माझी चौकशी केली होती. माझ्या घराची झडतीही त्यांनी घेतली होती. मात्र त्यामधून मी कोणतेही समान चोरल्याचे स्पष्ट झाले नव्हते,’ असंही या कर्मचाऱ्याने सांगितले आहे. मात्र या कर्मचाऱ्याने अशाप्रकारे इतरही समान चोरी केले आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.

विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहताना संबधित चोरीबद्दल माहिती समजली. पोलीस लवकरच या कर्मचाऱ्याला न्यायलयासमोर हजर करणार आहेत. चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.