दुबईची विमान कंपनी अमीरात एअरलाइन्सने विमानामध्ये ‘हिंदू मील’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या काही कंपन्यांकडून हा पर्याय प्रवाशांना दिला जातो, त्यानुसार प्रवासी आपल्या धार्मीक आस्थेनुसार स्वतःचं भोजन ठरवतात. मात्र, अमीरात एअरलाइन्सने आता ‘हिंदू मील’ हा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्या सेवेबद्दल आम्ही सातत्याने प्रवाशांकडून अभिप्राय मागवत असतो, आणि आतापर्यंत मिळालेल्या अभिप्रायच्या आधारेच आम्ही ‘हिंदू मिल’ हा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. हिंदू ग्राहक विमानामध्ये खानपानाची सेवा पुरवणाऱ्या आउटलेटमधून अॅडव्हान्समध्ये शाकाहारी जेवण ऑर्डर करु शकतात, असं कंपनीकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आलं आहे. यामध्ये जैन जेवण, भारतीय शाकाहारी जेवण, बिफ नसलेलं विशेष जेवण यांसारखे अनेक पर्याय आहेत, हिंदू ग्राहक आपल्या आवडीनुसार विमानाच्या कोणत्याही श्रेणीत जेवण ऑर्डर करु शकतात. पण कंपनीकडून यापुढे ‘हिंदू मील’चा पर्याय हटवला जाईल, असं अमीरात एअरलाइन्सने सांगितलं.

अनेक मोठ्या कंपन्या प्रवासादरम्यान शाकाहारी आणि मांसाहारी खाण्याचा पर्याय देतात, तर एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाइन्समध्ये धार्मिक जेवणाचा पर्याय उपलब्ध असतो.