News Flash

रुग्णालयाची माणुसकी! करोनाग्रस्त रुग्णाचं तब्बल 1.52 कोटीचं बिल केलं माफ

भारतीय दूतावासातील स्वयंसेवकानं घरी परण्यासाठी दिलं तिकीट आणि दहा हजार

रुग्णालयाची माणुसकी! करोनाग्रस्त रुग्णाचं तब्बल 1.52 कोटीचं बिल केलं माफ
राजेश हे बुधवारी सकाळी हैदराबादमध्ये परतले. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्र्से)

करोनामुळे सगळं चित्र पालटून गेलं असून, करोनाग्रस्त रुग्णांना उपचार घेताना अनेक समस्या जाणवत असल्याचा घटना देशभरात घडत आहेत. विशेष म्हणजे अनेक रुग्णांकडून रुग्णालयांनी वारेमाप बिल वसुल केल्याचे प्रकारही घडले आहे. अशात दुबईतील एका रुग्णालयानं आपल्या कृतीतून संवेदनशीलपणाची जाणीव करून देत आदर्श ठेवला आहे. दुबईत कामाला तेलंगणामधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली. उपचार घेऊन बऱ्या झालेल्या या रुग्णाला तब्बल १.५२ कोटी रुपयांचं बिल रुग्णालयानं दिलं. पण, नंतर रुग्ण बिल देण्यास असमर्थ असल्याचे कळताच माणुसकीच्या नात्यानं सगळं बिल माफ केलं. तर दुबईतील भारतीय दूतावासातील एका स्वयंसेवकानं या व्यक्तीला विमानाचं तिकीट व दहा हजार रुपये खर्चासाठी दिले.

राजेश लिंगाया ओडनाला असं ४२ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते तेलंगणातील जागतियल जिल्ह्यातील वेणुगुमतला गावातील रहिवाशी आहेत. राजेश हे मागील दोन वर्षांपासून दुबईत बांधकाम कामगार म्हणून काम करतात. अचानक आजारी पडल्यानंतर त्यांना २३ एप्रिल रोजी दुबईतील दुबई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं चाचणीच्या रिपोर्टमधून निष्पन्न झालं.

करोनामुळे राजेश हे ८० दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. ८० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, डिस्चार्ज देताना रुग्णालयाने त्यांना १ कोटी ५२ लाख रुपये बिल दिलं. राजेश यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून दुबईतील गल्फ वर्कर्स प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष गुंडेल्ली नरसिम्हा हे त्यांच्या संपर्कात होते. त्यांना रुग्णालयानं दिलेल्या बिलाबद्दल माहिती कळाली. राजेश यांना इतकं बिल भरणं अशक्य असल्यानं नरसिम्हा यांनी हे प्रकरण भारतीय दूतावासातील स्वयंसेवक सुमंथ रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिलं. सुमंथ आणि आणखी एक स्वयंसेवक अशोक कोटेच्छा यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतासावासातील अधिकारी हरजित सिंह यांना यात लक्ष घालण्याची विनंती केली. सिंह यांनी बिलासंदर्भात दुबई हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला पत्र दिलं. माणुसकीच्या नात्यानं या रुग्णाचं बिल माफ करण्यात यावं, अशी विनंती सिंह यांनी रुग्णालयाला केली. त्यावर रुग्णालयानं सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण बिल माफ केलं. तसेच राजेश यांना तात्काळ डिस्चार्जही दिला.

डिस्चार्ज मिळाल्यानंतर आर्थिक चणचण असलेल्या राजेश व त्यांच्यासोबत असलेल्या दयवारा कंकैय्या या दोघांना भारतात परण्यासाठी अशोक कोटेच्छा यांनी विमान तिकीट काढून दिले. तसेच सोबत खर्चासाठी १० हजार रुपयेही दिले. ८० दिवस उपचार घेतल्यानंतर राजेश हे बुधवारी सकाळी हैदराबादमध्ये पोहोचली. यावेळी त्यांना घेण्यासाठी त्यांचं कुटुंब विमानतळावर आलं होतं. दरम्यान, तेलंगणातील एआयएआर अधिकाऱ्यांनं त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइनमध्ये पाठवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 3:28 pm

Web Title: dubai hospital waives off rs 1 52 crore bill of telangana covid 19 patient bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चाबहार रेल्वे प्रकल्पावर डीलच नाही, तर वगळण्याचा प्रश्न कुठे येतो? इराणने केलं स्पष्ट
2 गरीबांवर, दलितांवर, शेतकऱ्यांवर हल्ला हाच भाजपाचा खरा चेहरा-प्रियंका गांधी
3 “आता केवळ देवच आपल्याला करोनापासून वाचवू शकतो”
Just Now!
X