27 September 2020

News Flash

दुबई: भारतीयानं हाल हाल करून केली आईची हत्या

हाडांचं फ्रॅक्चर, अंतर्गत रक्तस्त्राव, वेगवेगळ्या वस्तूंनी मारहाण, दुर्लक्ष आणि भूकमारी या सगळ्या गोष्टी महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्या

प्रतीकात्मक छायाचित्र

आपल्या पत्नीसोबत मिळून आईवर शारिरीक अत्याचार करत हत्या केल्याचा आरोप दुबईतील भारतीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून सुनावणी सुरु आहे. मुलाने अक्षरक्ष: आपल्या आईचे हाल करत हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. याशिवाय अंतर्गत रक्तस्त्राव आणि शरिरावर अनेक ठिकाणी देण्यात आले चटके मृत्यूसाठी कारणीभूत ठरले.

आरोपी मुलगा आणि त्याच्या पत्नीची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दांपत्याने सतत महिलेवर अत्याचार केले. अत्याचार करताना दोघांनीही अमानुषतेचा कळस गाठला. न्यायालयात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुलाने पत्नीसोबत मिळून आईच्या डोळ्याचं बुबुळ कापलं होतं. तसंच दुसऱ्या डोळ्यालाही जखम केली होती.

जवळपास चार महिने जुलै २०१८ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान हा अमानुष अत्याचार सुरु होता. धक्कादायक म्हणजे शवविच्छेदन अहवालानुसार, महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिचं वजन फक्त २९ किलो होतं. दांपत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र त्यांनी आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयात कर्मचारी असणाऱ्या दांपत्याच्या ५४ वर्षीय शेजाऱ्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी मुलाची पत्नी कशा पद्धतीने आपल्या घरी आली होती हेदेखील त्यांनी सांगितलं आहे. ‘आपल्या मुलीला घेऊन ती आली होती. आपली सासू भारतातून आली असून मुलीची नीट काळजी घेत नाही, यामुळे मुलगी सतत आजारी पडत असल्याचं तिने सांगितलं. कामावरुन घरी येईपर्यंत मुलीला आपल्या घरी ठेवावं अशी विनंती तिने केली’, असं त्यांनी सांगितलं.

तीन दिवसांनी साक्षीदाराला पीडित महिला बाल्कनीत जमिनीवर पडल्या असल्याचं दिसलं. ‘महिलेच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. शरिरावर चटके दिल्याच्या खुणा दिसत होत्या. मी लगेच सुरक्षा रक्षकाला कळवलं’, असं त्यांना सांगितलं. ‘मी दरवाजा ठोठावला असता आरोपीची आई जमिनीवर असल्याचं पाहिलं. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती. मी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली’, अशी माहिती साक्षीदाराने दिली आहे.

साक्षीदाराने कशापद्दतीने आरोपीच्या आईला रुग्णालयात नेलं जात असताना वेदना होत असल्याने रडत होती याबद्दल सांगितलं. ‘आईला नेलं जात असताना मुलगा मात्र घऱातून बाहेर आला नाही. मी मात्र त्याची वाट न पाहता निघून जाण्यास सांगितलं. नंतर काही चर्चा झाल्यानंतर तो गेला’, असं सांगितलं.

‘पीडित महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. त्यांचे हात आणि पाय सुजले होते. पायावर चटके दिल्याच्या खुणा होत्या. आम्ही मुलाकडे चौकशी केली असता आईने अंगावर गरम पाणी ओतून घेतलं असल्याचं त्याने सांगितलं’, अशी माहिती डॉक्टरने दिली आहे. शेजारी महिलेच्या मदतीसाठी धावत असताना मुलगा मात्र जागीच उभा होता. रुग्णवाहिकेत आईला पोहोचवण्याची तसदीही त्याने घेतली नाही.

‘महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आले. महिलेचं १० टक्के शरीर भाजलं होतं. हाडांचं फ्रॅक्चर, अंतर्गत रक्तस्त्राव, वेगवेगळ्या वस्तूंनी मारहाण, दुर्लक्ष आणि भूकमारी या सगळ्या गोष्टी महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्या’ असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी खटला सुरु असून ३ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. तोपर्यंत दांपत्य ताब्यात राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 1:44 pm

Web Title: dubai indian man wife torture mother death sgy 87
Next Stories
1 खासदार नुसरत जहां टर्कीमध्ये अडकली विवाहबंधनात, शपथविधीला गैरहजर
2 पाकिस्तानबरोबर चर्चेस तयार असल्याचा दावा भारताने फेटाळला
3 काँग्रेस अध्यक्षपदाची माळ अशोक गेहलोत यांच्या गळ्यात?
Just Now!
X