सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक भारतीय जगाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांमध्ये अद्यापही अडकलेले आहेत. परंतु दुबईत अडकलेल्या काही महाराष्ट्रातील कुटुंबांसाठी मसाला किंग म्हणून ओळखले जाणारे डॉ. धनंजय दातार हे संकटमोचक ठरले आहेत. त्यांनी तब्बल १३६ मराठी कुटुंबीयांना स्वखर्चानं मायदेशी पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दुबईत अडकलेल्या आणि रोजगार नसलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनाही भारतात पाठवलं होतं.

दुबईत अडकलेल्या कही कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणं अवघड झालं होतं. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गर्भवती महिला व लहान मुले यांचाही समावेश होता. रोजगार गमावल्याने व राहत्या जागेचे भाडे भरण्यासाठीही पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यांच्यापुढे रोजच्या भोजनाचा प्रबंध कसा करायचा याबाबतच्याही अडचणी होत्या. एकट्या महाराष्ट्रातील ६५ हजारांहून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

यादरम्यान, दुबई स्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी शेकडो कुटुंबीयांना मायदेशी पाठवलं आहे. यापूर्वीही त्यांच्या मार्फत लॉकडाउनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवण्यात आले होते. संयुक्त अरब अमिराती आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी सीएसआर उपक्रमांतर्गत जवळपास ३ हजार ५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकीटाचा खर्च उचलून त्यांना सुखरुप भारतात रवाना केले. त्यामध्ये केरळ, तमीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. दरम्यान, ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी स्वतः अथवा नातलगांमार्फत संपर्क साधावा, असं आवाहन डॉ. दातार यांनी केलं आहे.