दुर्मीळ पशुपक्षांच्या जतनासाठी राष्ट्रीय उद्यानांची स्थापना करण्यात येते. जगभरात असे अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत जिथे वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे पशु आणि पक्षी आहेत. त्यातीलच एक राष्ट्रीय उद्यान म्हणजे उत्तर प्रदेशातील ‘दुधवा नॅशनल पार्क’. या पार्कमध्ये जगभरातील अनेक पशुपक्षी आहेत. तसेच जर एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफीची आवड असेल तर अशा व्यक्तीने वाईल्डफोटोग्राफीचा आनंद घेण्यासाठी या नॅशनल पार्कला नक्कीच भेट द्यायला हवी. या नॅशनलपार्कविषयी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितच नाही. या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील पाच मुद्द्यांचा फायदा होतो.

१ उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीराजवळ दुधवा हे राष्ट्रीय उद्यान असून सौंदर्याने परिपूर्ण अशा उद्यानामध्ये याचा समावेश करण्यात येतो. हे राष्ट्रीय उद्यान वाघ आणि बारशिंगा या प्राण्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. डिसेंबर ते मार्च हा कालावधी या उद्यानाची सैर करण्याचा उत्तम काळ असल्याचे सांगण्यात येते.

२. भारत-नेपाळ सीमेनजीक असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची १९५८ मध्ये ‘वाईल्ड लाईफ सेंच्युरी’ म्हणून स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७७ मध्ये त्याचे ‘नॅशनल पार्क’मध्ये रुपांतर करण्यात आले.

३. सुरुवातीच्या काळात या राष्ट्रीय उद्यानात वाघ, बिबट्या, गेंडा, हत्ती, बारशिंगा, चित्ता, सांबार, नीलगाय, कोल्हा, ओपन बिल्ड स्टार्क, पॅन्टेड स्टार्क, ब्लॅक नेक्ड स्टार्क, फ्लाईंग स्क्वॅरल यासारख्या पशुपक्षांची वर्दळ होती. कालांतराने ही वर्दळ कमी झाली. मात्र अजूनही येथे वाघ आणि बारशिंगाची संख्या ब-यापैकी आहे.
४. जर छायाचित्रकारांनी व्हाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची असले तर त्यांनी या नॅशनलपार्कला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. या पार्कमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. यंदादेखील ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान ‘बर्ड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे.
५. भारतीय उपखंडांमध्ये आढळणारे १३०० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी जवळपास ४०० प्रजाती तर एकट्या दुधवा नॅशनल पार्कमध्ये आढळून येतात. यामध्ये हॉर्नबिल, रेड जंगल फ़ॉवल, पीटा फोवल, बंगाल फ्लोरिकन, मत्स्य पालन ईगल, बंगाल फ्लोरिकन, तुरेवाला सर्पगरुड, ऑस्प्रे, स्वर्ग फ्लाईकचर, वुडपॅकर्स, शामा, इंडियन पिटा, ओरिओल्स, अॅमेरल्ड कबव या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे व्हाईल्डलाईफ फोटोग्राफर्सना येथे आल्यावर फोटोची मेजवानीच मिळेल हे निश्चित.

हिवाळ्यात या उद्यानामधील पशुपक्षी घनदाट जंगलातून बाहेर येतात. त्यामुळे येथे छायाचित्रकारांना वेगवेगळ्या पक्षांचे आणि प्राण्यांचे फोटो काढता येतील. तसेच येथे कुटुंबासमवेत जाऊन देखील भेट देता येते. मैलानी या स्थानकापासून १०७ किलोमीटर अंतरावर दुधवा नॅशनल पार्क असून लखनौवरुन देखील येथे जाता येते. तसेच पर्यटकांना येथे राहण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी थारू हट दुधवा, वन विश्राम भवन बनकटी, किशनपुर, सोनारीपुर, बेलरायां, सलूकापुर, सठियाना वन विश्राम भवन येथे राहण्याची सोय करण्यात येते.