करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत ५७ देशांत पसरला असून अनेक शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींचे ४४४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक १२ टक्क्यांनी घसरला आहे. पाच दिवसांत लागोपाठ झालेली ही घसरण २००८च्या आर्थिक पेचप्रसंगानंतर पहिल्यांदाच दिसून आली. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत ६ लाख कोटी डॉलर क्षणार्धात बुडाले. यातून जगातील ५०० अब्जाधीशांनी या वर्षांच्या सुरुवातीपासून कमावलेला ७८ अब्ज डॉलरचा नफाही मातीमोल झाल्याचे ‘ब्लूमबर्ग’ अब्जाधीश निर्देशांकातून समोर आले आहे.

आरोग्य अधिकारी करोना संसर्गाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्याचा प्रसार वाढतच आहे. या विषाणूमुळे न्यूमोनिया होतो, हा विषाणू दक्षिण कोरिया, इराण, अमेरिका यांसह ५७ देशांत पसरला आहे. ब्लूमबर्ग संपत्ती निर्देशांक यादीत आता ८० टक्के अब्जाधीशांची क्रमवारी धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कार्निव्हल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मिकी अ‍ॅरिसन यांनी सांगितले की, या आठवडय़ात त्यांनी १ अब्ज डॉलर गमावले आहेत. अ‍ॅरिसन हे जगातील सर्वात मोठय़ा क्रूझ जहाज कंपनीचे मालक असून जपानमधील डायमंड प्रिन्सेस या क्रूझ जहाजावर पाच करोना रुग्ण दगावले आहेत, तर जहाजावरून उतरून गेलेल्या अनेकांना नंतर करोनाचा संसर्ग झाला आहे.

मोठा तोटा.. : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना सर्वाधिक तोटा झाला. त्यांची मालमत्ता एकूण ३० अब्ज डॉलरनी घसरली. अब्जाधीशात २५व्या क्रमांकावर असलेले इलॉन मस्क यांना आठवडय़ात लागोपाठ चौथ्यांदा ९ अब्ज डॉलरचा फटका बसला असून त्यांच्या टेस्ला इनकॉर्पोरेशनचे समभाग (शेअर्स) वर्षांच्या अखेरीस जोमात असताना करोनामुळे घसरले. तरी त्यांच्याकडे अजून ८.८ अब्ज डॉलरचा नफा असून एकूण मालमत्ता ३६.३ अब्ज डॉलरची आहे.

जागतिक साथ नाहीच; इराणच्या मदतीला चीन  

चीनमधील करोना विषाणू उद्रेकामुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असली तरी अजून ती जागतिक साथ जाहीर करता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. चीनमध्ये करोना विषाणूने शुक्रवारी ४७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता २८३५वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या आता ७९२५१ झाली आहे. दरम्याम, इराणमध्ये  करोना विषाणूने ४३ बळी घेतले असून तेथील परिस्थिती चिंताजनक असताना आता चीनचे एक तज्ज्ञ पथक मार्गदर्शनासाठी तेथे गेले आहे. इराणमधील रूग्णांचे प्रमाण ५३ टक्के वाढले असून तेथे शनिवारी नऊ रुग्ण दगावले.