गेली २५ वर्ष त्रिपुरात एकाच पक्षाचं सरकार असूनही राज्याचा पूर्णपणे विकास होऊ शकला नाही. माणिक सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाचा अनागोंदी कारभार यासाठी जबाबदार असल्याचं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वाढती बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आगामी निवडणुकीत भाजप त्रिपुरात आपली सत्ता स्थापन करेल असा आत्मविश्वास यावेळी शाह यांनी व्यक्त केला.

अवश्य वाचा – मोदी गोलंदाज नव्हे तर विकेटकिपरकडे पाहून फलंदाजी करणारे क्रिकेटपटू, राहुल गांधींचा टोला

“येणाऱ्या निवडणुकीनंतर त्रिपुरात भाजप आपली सत्ता स्थापन करेल. राज्यातील जनतेमध्ये कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध राग आणि असंतोषाची भावना आहे. माणिक सरकार यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्रिपुरा विकासाच्या बाबतीत नेहमी मागे राहिलं, आणि याचा फटका त्रिपुरातील जनतेला सहन करावा लागला.” नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते.

अवश्य वाचा – हिंसाचाराला भाजपा घाबरत नाही, त्रिपुरात अमित शहांचा माकपला इशारा

विकासकामांसाठी देण्यात आलेल्या निधीवर डल्ला मारत सरकारने लोकांची फसवणूक केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने त्रिपुराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला होता. मात्र कम्युनिस्ट पक्षाने यातला एकही पैसा जनतेपर्यंत पोहचू दिला नाही. त्यामुळे केंद्राच्या एकाही कल्याणकारी योजनेचा त्रिपुरातील लोकांना चांगल्या पद्धतीने फायदा घेता आला नाही. अमित शाह यांनी कम्युनिस्ट सरकारवर आरोपांची राळ उडवली. याआधी त्रिपुरात झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनीही माणिक सरकार यांच्या कारभारावर टीका केली होती. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा सरकार यांनी योग्य वापर केला नसल्याचंही मोदी म्हणाले होते.

त्रिपुरा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजपने जास्तीत जास्त जनतेचा आपल्याला पाठींबा मिळेल याची काळजी घेतली आहे. विशेष आर्थिक क्षेत्र, आयटी यासारख्या क्षेत्रांमधून रोजगार निर्मिती, प्रत्येक तरुणाला स्मार्टफोन, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष उपाययोजनांचाही भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे.