पत्नीच्या निधनानंतर तिच्यावर अंत्यविधी करण्यासाठी पैसा नसल्यामुळे पतीला कचरा गोळा करावा लागल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये समोर आली आहे. इंदोरपासून २७५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रतनगढ या गावातील आदिवासी कुंटुंबावरील ही व्यथा माणुसकी हरविल्याचे चित्र निर्माण करणारी आहे. रतनगढमधील गावातील जगदीशच्या पत्नीचे शुक्रवारी निधन झाले. पत्नीवर अंत्यविधीसाठी पैसे नसल्यामुळे चक्क टायर, प्लॅस्टिक आणि पालापाचोळा गोळा करण्याची वेळ आली.
शुक्रवारी पत्नीच्या निधनानंतर जगदीश यांनी पैशाची मदत मागण्यासाठी पंचायतीमध्ये धाव घेतली. मात्र, अंत्यविधीसाठी त्यांना २५०० रुपयांची मदत करण्यास पंचायतीने नकार दिला. एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीमध्ये गावाने दु:खाच्या प्रसंगी आपल्याला मदत करण्यास नकार दिल्याचे जगदीशच्या भावाने सांगितले. पैसे देण्यास नकार देऊनच फक्त गाववाले थांबले नाहीत, तर त्यांनी मृतदेह फेकून देण्याचा सल्लाही दिला. एका व्यक्तिने तर या कुटुंबियाला पैसे नाहीत तर मृतदेह नदीत फेकण्याची भाषा वापरली. पैसे नसल्यामुळे आपल्या पत्नीला अग्नी देता येणार नसल्याचे लक्षात आल्याने पती जगदीश आणि त्याच्या कुटुंबियांनी पत्नी नोजीबाईला दफन करण्याचा निर्णय घेतला.
मात्र जगात अजून माणुसकी शिल्लक असल्याचा एक दाखला मिळाला. एका समाज सेवकाने जगदीशला मदत केली. त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणि लाकुड पुरविल्यामुळे आदिवासी जगदीश यांना आपल्या पत्नीवर अंत्यविधी पार पाडणे शक्य झाले. अंत्यविधी उरकल्यानंतर सायंकाळी पाच वाजता प्रशासनाला जाग आली. त्यांनी या परिवाराला मदत करण्याच्या हेतून लाकडे पाठवली. मात्र तोपर्यंत अंत्यविधी उरकला होता. जिल्हाधिकारी रजनीश श्रीवास्तव यांनी या घटनेची निंदा केली आहे. आम्हाला उशिर झाला मात्र माहिती मिळाल्यानंतर आम्ही या कुटुंबियांना मदत पुरवली होती. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच ओडीसामधील एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह १० किलो अंतर खांद्यावरुन घेऊन जावे लागल्याची घटना समोर आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 9:05 pm