बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या डेरा सच्चा सौदाच्या गुरमित राम रहिम यांना सोमवारी दुपारी १ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीबीआयचे विशेष न्यायालय रोहतकमधील तुरुंगातच याबद्दलची सुनावणी घेणार आहे. काल (शुक्रवारी) सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहिम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर हरयाणासह चार राज्यांमध्ये राम रहिम यांच्या अनुयायांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. हरयाणाला या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका बसला.

हरयाणातील पंचकुला, सिरसा या भागांमध्ये राम रहिम यांच्या समर्थकांनी अक्षरश: हैदोस घातला. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या हिंसाचारात आतापर्यंत ३२ जणांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे राम रहिम यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने हरयाणामध्ये असताना आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलात जमले असतानाही हरयाणा सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. पोलीस आणि प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी निकालाच्या आधी सांगितले होते. मात्र त्यांचा हा दावा निकालानंतरच्या अवघ्या काही मिनिटांमध्येच फोल ठरला.

राम रहिम यांना दोषी ठरवले जाताच डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी राज्यभर हिंसाचार सुरु केला. हा हिंसाचार रोखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. राम रहिम यांच्या समर्थकांनी अनेक इमारतींची तोडफोड केली. याशिवाय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही हल्ले केले. राम रहिम यांच्या समर्थकांनी वृत्तवाहिनांच्या तीन ओबी व्हॅन पेटवून दिल्या. विशेष म्हणजे निकालाच्या एक दिवस आधीच पंचकुलामध्ये एक लाखाहून अधिक समर्थक जमा झालेले असतानाही पोलीस प्रशासनाने अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला.

हरयाणा सरकारच्या या निष्काळजीपणावर पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. राजकीय फायद्यासाठी राज्यातील हिंसाचार रोखण्यात आला नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे पंतप्रधान नाहीत, असे म्हणत उच्च न्यायालयाने थेट केंद्र सरकारलाही धारेवर धरले.