पक्षातील एका विशिष्ट गोष्टीमुळे सध्या काँग्रेसची मरणासन्न अवस्था झाली आहे. त्यामुळेच नेत्यांनाही उतरती कळा लागली, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

आझाद म्हणाले, “आमच्या पार्टीची रचनाच कोसळली आहे. त्यामुळे आम्हाला पक्षाची रचनात्मक पुनर्बांधणी करावी लागेल. त्यानंतर एखादा नेता या रचनेनुसार निवडून आला तर ते काम करेल. मात्र, नुसतं नेते बदलून आम्ही बिहार, युपी, एमपी जिंकू असं म्हणणं चुकीचं आहे. आपण व्यवस्था बदलल्यानंतरच हे बदलू शकेल.”

“कोविडच्या स्थितीमुळे गांधी परिवार सध्या जास्त काही करु शकत नाही त्यामुळे मी त्यांना क्लीनचीट देतो. हायकमांडकडे आम्ही केलेल्या मागण्यांमध्येही बदल झालेला नाही. आमच्या बहुतेक मागण्यांवर ते सहमत झाले आहेत. जर देशभरात पर्याय निर्माण करायचा असेल आणि पार्टीला पुनरुज्जीवित करायचं असेल तर आमच्या नेत्यांना पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्याच लागतील,” असा महत्वाचा मुद्दा आझाद यांनी मांडला आहे.

“आत्तापर्यंत आम्ही पक्षाचं कामकाज प्रत्येक पातळीपर्यंत बदललं, पण कामाच्या पद्धती बदलल्या नाहीत. नेतृत्वाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देण्याची गरज असून त्या त्या पदांसाठी निवडणुका घ्यायला हव्यात. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून घेतल्या पाहिजेत. आत्तापर्यंत पदाधिकारी नेमले जात होते. पण जर सर्व पदाधिकारी निवडले गेले तर त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळतील. सध्या पक्षात कोणालाही कोणतंही पद दिलं जातं,” अशा शब्दांत त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली.

गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्या खूपच खराब कामगिरी झाली आहे. शेवटच्या दोन टर्ममध्ये लोकसभेत काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपदही नाही. पण काँग्रेसने लडाख हिल काऊन्सिल निवडणुकीत ९ जागा जिंकल्या. मात्र, हा सकारात्मक निकाल आम्हालाही अपेक्षित नव्हता, अशा शब्दांत आझाद यांनी पक्षाच्या दुसऱ्या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुकही केले.