पंतप्रधान मोदींचे मत; बोधगया आता आध्यात्मिक राजधानी

एखाद्या धर्माचे अनुसरण करण्यात काही समस्या नसते पण जेव्हा काही मूलतत्त्ववादी घटक दुसऱ्यावर त्यांची विचारसरणी सक्तीने लादतात तेव्हा संघर्षांची स्थिती निर्माण होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बोधगयाला ‘अध्यात्मिक राजधानी’ म्हणून विकसित करण्याची घोषणाही त्यांनी महाबोधी मंदिराला भेट दिल्यानंतर केली.

हिंदू-बौद्ध परिषदेतील प्रतिनिधींसमोर महाबोधी मंदिरात बोलताना त्यांनी सांगितले की, दोन्ही धर्माचे जे विद्वान दिल्लीतील चर्चेस उपस्थित होते त्यांनी आशिया व इतरत्र संघर्ष टाळण्याचे व पर्यावरणाबाबत जागरूकता दाखवण्याचे मान्य केले आहे.  दिल्लीतील परिषद विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन व टोकियो फाउंडेशन यांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या मदतीने आयोजित केली होती. बरेच प्रश्न हे धार्मिक असहिष्णुतेने निर्माण होतात. धार्मिक स्वातंत्र्य मान्य करण्यात गैर काहीच नाही. मूलतत्त्ववादी शक्ती आपली विचारसरणी दुसऱ्यांवर लादतात तेव्हा संघर्ष होतो हे आताच्या परिषदेतही मान्य करण्यात आले आहे. हिंदू-बौद्ध नागरी व सांस्कृतिक संस्थेने विषयसूची ठरवली होती. त्यात संघर्ष टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, आशिया हा आर्थिक व सांस्कृतिक पातळीवर पुढे येत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. येत्या जानेवारीत अशाच परिषदा टोकियो फाउंडेशनसह काही बौद्ध देशांनी आयोजित केल्या

आहेत.

बोधगया ही आत्मज्ञानाची भूमी आहे व सरकारने भारत व बौद्ध जगाची सांगड घालून या ठिकाणाला अध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे.  बोधगया हे शांततेच्या शोधातील तीर्थयात्रेचे प्रतीक आहे. बौद्ध देशांना समाधान वाटेल अशा पद्धतीने बोधगयाचा विकास केला जाईल असे मोदी यांनी सांगितले.