सध्या आपल्या विरोधात सुरू असलेली महाभियोग चौकशी म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील दुटप्पीपणाचा कळस आहे, अशी टीका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण असलेल्या महाभियोग चौकशी समितीसमोर युक्रेनमधील माजी राजदूत मारी योवानोविच यांनी जी साक्ष दिली, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की इतका दुटप्पीपणा देशाच्या इतिहासात कधी पाहिला नव्हता. ट्रम्प यांनी मारी योवानोविच यांच्या साक्षीपूर्वी त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्हालोदमीर झेलेन्स्की यांना केलेल्या एप्रिलमधील दूरध्वनीचा लेखी तपशील सादर केला आहे. त्या तपशीलाचा दाखला देत त्यांनी काही चूक केली नसल्याचा दावा केला.

ट्रम्प यांनी त्यावेळी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की युक्रेनमधील अमेरिकी राजदूत योवानोविच यांचे काम चांगले नाही, अशी तक्रार युक्रेनच्या अध्यक्षांनी दूरध्वनीवरील संभाषणात केली होती. मारी योवानोविच जेथे गेल्या तेथे काम चांगल्या प्रकारे केले नाही. राजदूतांची नेमणूक करण्याचा अधिकार अमेरिकी अध्यक्षांना असतो.

याआधारे योवानोविच यांनी त्यांना धमकावण्यात आल्याचे म्हटले असले, तरी अध्यक्षांनी केवळ त्यांचे मत व्यक्त केले होते, असा खुलासा व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव स्टीफनी ग्रीश्ॉम यांनी केला. महाभियोगाची चौकशी हा बेकायदा प्रकार असून त्यात कुठलीही न्याय प्रक्रिया नाही अशी टीकाही त्यांनी केली.

डेमोक्रॅटिक नेते, माजी उपाध्यक्ष व सध्याच्या अध्यक्षीय निवडणुकीतील अध्यक्षीय उमेदवारीचे दावेदार जो बिदेन व त्यांचा मुलगा हंटर बिदेन यांच्या चौकशीसाठी युक्रेनच्या अध्यक्षांवर  दबाव आणण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना  योवानोविच यांनी साथ दिली नव्हती. त्यामुळे एप्रिल २०१९ मध्ये कीव येथे परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बोलावून घेऊन मिळेल त्या विमानाने वॉशिंग्टनला परत जाण्यास फर्मावले. तेथे परतल्यानंतर योवानोविच यांना वरिष्ठांनी असे स्पष्ट केले, की तुम्ही काही चूक केलेली नाही हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला पद सोडावे लागणार आहे. कारण अध्यक्षांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही.