कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे. मोहरमनंतर दूर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा सरकारचा आदेश रद्द केला आहे. मोहरम आणि इतर दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दूर्गामूर्तीचे विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे. तसेच दूर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन मार्ग आणि मोहरमच्या ताजियाचा मार्ग सूनिश्चित करा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

पश्चिम बंगाल सरकारने दिलेल्या आदेशाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आहे. मोहरमनंतर दूर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे, असा आदेश सरकारने दिला होता. हा आदेश रद्द करण्यात आला असून मोहरमसह इतर दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत विसर्जन करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. सरकार लोकांच्या श्रद्धेमध्ये दखल देऊ शकत नाही. कोणत्याही तथ्याशिवाय ताकदीचा वापर करणे साफ चुकीचे आहे. सरकारकडे अधिकार आहेत, पण ते अमर्याद नाहीत. कोणत्याही आधाराशिवाय ताकदीचा वापर करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.

त्याआधी बुधवारीही न्यायालयाने सरकारला कठोर शब्दांत सुनावले होते. राज्यात जातीय सलोखा आहे असा दावा सरकार करत आहे. मग तुम्ही दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा सवाल केला होता.