उत्तर प्रदेशातील वाळूमाफियांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे दुर्गा शक्ती नागपाल या महिला सनदी अधिकाऱ्याला निलंबित केल्याच्या मुद्दय़ावरून सोमवारी केंद्र सरकार व उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्ष यांच्यात चांगलीच जुंपली. नागपाल यांच्या निलंबन कारवाईचा अहवाल केंद्र सरकारने मागवला असताना समाजवादी पक्षाने मात्र त्याची दखल न घेता उलट राज्यातील सर्वच आयएएस अधिकाऱ्यांना केंद्राने परत बोलावून घ्यावे असा टोला हाणला. दरम्यान, यादव पितापुत्रांनीही नागपाल यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले.
नागपाल यांच्यावरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देणारे पत्र रविवारी केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पाठवले होते. या पाश्र्वभूमीवर सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा गाजला.
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी केंद्र सरकारने राज्यातील सर्वच आयएएस अधिकाऱ्यांना माघारी बोलावून घ्यावे असा टोला हाणत नागपाल यांच्यावरील कारवाई योग्यच असल्याचा निर्वाळा दिला. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केंद्राच्या नोटिशीची दखल न घेता नागपाल यांच्यावर कारवाई  करून कोणतीही चूक केली नसल्याचे स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा व खासदार मुलायमसिंह यादव यांनीही संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना नागपाल यांच्यावरील कारवाईला पाठिंबा दर्शवला.