दोन दशकांपूर्वी लढल्या गेलेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. पण या युद्धाच्याकाळात अन्य देशांनी आपल्या परिस्थितीचा फायदा उचलला. माजी लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना हा खुलासा केला. त्यावेळी शत्रुच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला उपग्रहांचे फोटो, शस्त्रास्त्र आणि दारु गोळयाची तात्काळ गरज होती. त्यावेळी या सर्व साहित्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

“कारगिल युद्धकाळात काही गोष्टी आपल्याला तात्काळ खरेदी कराव्या लागणार होत्या. त्यावेळी देश कुठलाही असो, त्यांनी शक्य तितका आपल्या परिस्थितीचा फायदा उचलला. आपण एका देशाकडे बंदुकांसाठी संपर्क साधला होता. त्यांनी बंदुका देण्याचे आश्वासन दिले पण आपल्याला जुन्या वापरलेल्या बंदुका दिल्या. आपल्याकडे दारुगोळा नव्हता. एकादेशाकडे दारुगोळयाची मागणी केली, तेव्हा त्यांनी १९७० च्या दशकातील दारुगोळा आपल्याला दिला.” ‘मेक इन इंडिया अँड नेशन्स सिक्युरिटी’ कार्यक्रमाच्या पॅनल चर्चेमध्ये व्ही.पी. मलिक यांनी हा खुलासा केला.

इतकेच नव्हे तर, “कारगिल युद्धाच्यावेळी आपण जे सॅटेलाइट फोटो खरेदी केले. त्या प्रत्येक फोटोसाठी आपल्याला ३६ हजार रुपये मोजावे लागले. ते फोटो सुद्धा लेटेस्ट नव्हते. तीन वर्षआधी काढलेले ते फोटो होते.” असे मलिक म्हणाले. कारगिल युद्धाच्यावेळी जनरल मलिक भारताचे लष्करप्रमुख होते. सार्वजनिक क्षेत्राकडून आवश्यक शस्त्रास्त्रे मिळत नाहीत त्यामुळेच भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रांची आयात करावी लागते असे मलिक म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आपल्याला ज्या वेळी एखाद्या उपकरणाची गरज असते, तेव्हा ते वेळेवर मिळत नाही. पुढे जेव्हा, ते उपकरण मिळते तो पर्यंत टेक्नोलॉजी जुनी झालेली असते” असे मलिक म्हणाले.