15 December 2017

News Flash

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ABVP ला झटका; काँग्रेसच्या NSUI चा विजय

अध्यक्ष-उपाध्यक्षपदी विजय

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: September 13, 2017 4:37 PM

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत एनएसयूआयने विजय मिळवला.

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) ‘जोर का झटका’ देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) दणदणीत विजय मिळवला आहे. ‘एबीव्हीपी’चे वर्चस्व संपुष्टात आणत ‘एनएसयूआय’ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कब्जा केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीद याने एबीव्हीपीच्या रजत चौधरी याचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदावरही एनएसयूआयच्या उमेदवाराने विजय मिळवला. एबीव्हीपीला सचिव आणि सहसचिवपदावर समाधान मानावे लागले. एनएसयूआयने चार वर्षांनी वर्चस्व मिळवले असून, या निवडणुकीत मिळवलेला विजय सर्वात मोठा असल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

कडक बंदोबस्तात बुधवारी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. एनएसयूआयच्या रॉकी तुशीदने अध्यक्षपदी विजय मिळवून एबीव्हीपीचे चार वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले. एबीव्हीपीचे रजत चौधरी, तुशीद, एआयएसएची पारल चौहान आणि अपक्ष उमेदवार राजा चौधरी हे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ४३ टक्के मतदान झाले. गेल्या वर्षी एबीव्हीपीने तीन पदांवर विजय मिळवला होता. त्यावेळी एनएसयूआयने सहसचिवपदावर विजय मिळवला होता.

First Published on September 13, 2017 4:37 pm

Web Title: dusu election 2017 nsui wins president and vice president posts abvp wins secretary joint secretary posts