राजकीय घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत भाजपा खासदार वरून गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना घरचा अहेर दिला आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देण्यात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे त्यांचे भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना टोला लगावला आहे. राजकारणातील घराणेशाहीमुळे सामान्य माणसासाठी राजकारणाचे दरवाजे बंद होत चालले आहेत ही बाब खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी टीका वरूण गांधी यांनी केली आहे. आपण असे राजकारण केले पाहिजे ज्यामुळे सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. मात्र प्रत्यक्षात राजकारण असे केले जाते आहे ज्यात घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते.

जनतेलाही ठाऊक आहे राजकारणात घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा स्तरावर, राज्य पातळीवर किंवा देश पातळीवरही होणाऱ्या राजकारणात घराणेशाहीला महत्त्व दिले जाते. कटू असले तरीही हेच वास्तव आहे असेही वरूण गांधी यांनी म्हटले आहे. फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्सने ‘भारताच्या भविष्याचा मार्ग, संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याच व्याख्यानात वरूण गांधी यांनी टीका करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. एखाद्या छोट्या गावात राहणारा तरूण ज्याच्याकडे ज्ञान आहे, प्रतिभा आहे अशा युवकाचे ज्ञान वाया जाते. मी राजकीय परिवाराचा भाग नसतो तर राजकारणात आलोच नसतो असेही वक्तव्य वरूण गांधी यांनी केले.