भारतातील घराणेशाहीचे समर्थन करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घराणेशाही आणि लोकशाही एकत्र नांदू शकत नाही. तसेच घराणेशाही ही पूर्णपणे अयोग्य आहे. मात्र, आपल्याकडे काहीजण त्याचे समर्थन करतात, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाचा रोख राहुल गांधी यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. मात्र, आपण हे एखाद्या पक्षाला किंवा व्यक्तीला उद्देशून बोलत नसल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना काँग्रेस पक्षातील घराणेशाहीबद्दल विचारणा करण्यात आली. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी म्हटले की, यासाठी एकट्या काँग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. ‘देशातील अनेक पक्षात आजही घराणेशाही चालते. मग ते अखिलेश यादव असो किंवा करुणानिधी यांचा मुलगा स्टालिन… सगळीकडे घराणेशाही आहेच. एवढेच काय तर बॉलिवूड क्षेत्रात, व्यावसायिकांमध्येही घराणेशाही आहे. अभिषेक बच्चनपासून ते अंबानी कुटुंबियांपर्यंत सगळीकडे घराणेशाही पाहायला मिळते. इन्फोसिसही काही यापेक्षा वेगळे नाही.’, असे सांगत राहुल यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीचे समर्थन केले होते.

या वक्तव्यामुळे राहुल यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. घराण्याचा वंशज आणि घराणेशाही या गोष्टी भारतीय व्यवस्थेचा अविभाज्य भाग असल्याचा त्यांचा दावा विसंगतीपूर्ण असल्याचे स्मृती इराणी म्हटले होते. तर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही ट्विटरवरून राहुल यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी, १०६ वर्षांच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात कपूर कुटुंबियांचे सिनेसृष्टीत ९० वर्षांचे योगदान आहे आणि प्रत्येक पिढीला त्यांच्यातील गुणांमुळे लोकांनी स्विकारले आहे,’ असे पहिले ट्विट केले. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, देवाच्या कृपेने आमची चौथी पिढी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि आता रणबीर कपूर. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी राजघराण्यावर व्यर्थ बडबड करु नये. तुम्ही लोकांनी जबरदस्ती आणि गुंडगिरी न करता अथक मेहनत करुन जनतेचे प्रेम आणि सन्मान मिळवला पाहिजे, असे ऋषी कपूर यांनी राहुल यांना सुनावले होते.