संसद प्रश्नोत्तरे
अतिवेगवान रेल्वेमार्गाच्या प्रतिकिलोमीटर उभारणीचा खर्च १०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक असून देशभरात संपूर्ण कॉरिडॉरची उभारणी करण्यासाठी ८० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली.
नेहमीचा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा हा खर्च १० ते १४ पटींनी अधिक असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. वेगवान गाडय़ांच्या मार्गासाठी ८० हजार कोटी रुपयांची गरज भासेल, असेही ते म्हणाले. सध्या रेल्वेकडे वेगवान गाडय़ांसाठी कॉरिडॉर नसून मुंबई-अहमदाबाददरम्यानच्या वेगवान मार्गासाठी भारत आणि जपानने संयुक्तरीत्या अभ्यास सुरू केला असून हे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे प्रभू यांनी नमूद केले.
सध्या दिल्ली-आग्रा रेल्वेमार्गावर ताशी १५० किलोमीटर वेगाने शताब्दी एक्स्प्रेस धावते. हा सर्वाधिक वेग असून भारतातील अन्य गाडय़ांचा २०१३-१४ या वर्षांतील सरासरी वेग ५०.६ किलोमीटर प्रतितास होता, असे प्रभू यांनी सांगितले.
कारखान्यांमधील अपघात
देशभरातील विविध कारखान्यांमध्ये २०१३ साली झालेल्या प्राणघातक अपघातांची संख्या पूर्वीच्या वर्षांपेक्षा वाढून सुमारे १४०० झाली असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली.
देशभरातील कारखान्यांमध्ये २०१३ साली १४१७ अपघात झाले. २०१२ साली ही संख्या १३८३, तर २०११ साली १४३३ इतकी होती. मुख्य कारखाना निरीक्षकांनी गोळा केलेल्या माहितीनुसार प्राणघातक नसलेल्या अपघातांची संख्या  वरील वर्षांमध्ये अनुक्रमे २६,९५३, २८,४४१ आणि २८,४०४ इतकी होती, असे श्रम मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितले.
२०१३ सालच्या प्राणघातक अपघातांमध्ये गुजरातमध्ये सर्वाधिक २१८, तर महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात अनुक्रमे १९९ व १३७ अपघात झाले. याच वर्षांतील प्राणघातक नसलेल्या अपघातांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे १९२५०, तर गुजरातमध्ये २२८५ अपघात झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
अवैधरीत्या विदेशात नेलेल्या ११ पुरातन वस्तू परत आणणार
भारतातून ११ पुरातन मौल्यवान वस्तू अवैधरीत्या विदेशात नेण्यात आल्याचे आढळले असून, त्या परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरकारने सोमवारी लोकसभेत दिली.
अभिलेखाप्रमाणे, सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तूंची देशाबाहेर अवैधरीत्या वाहतूक करण्यात आली आहे. या वस्तू परत मिळवण्याकरिता केंद्र सरकारने वकिलातींमार्फत त्या-त्या देशांशी संपर्क साधला आहे, असे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
भगवान विष्णूची अमेरिकेत असलेली भग्न मूर्ती, जर्मनीत सापडलेली दुर्गा मूर्ती, ऑस्ट्रेलियात असलेला कुषाण साम्राज्यातील बुद्धाचा बसलेल्या अवस्थेतील पुतळा आणि कॅनडात असलेली खजुराहोची प्रसिद्ध ‘पॅरट लेडी’ यांच्यासह इतर वस्तू परदेशातून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.