News Flash

”काश्मीर तर सोडाच आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा”

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांचा पंतप्रधान इम्रान खान यांना टोला

काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगभर आपले गाऱ्हाणे ऐकवण्यासाठी फिरत आहेत. मात्र त्यांना कुठेच दाद मिळत नसल्याने अखेरीस सोमवारी त्यांनी काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असे म्हणत, भारताला धमकवण्यासाठी आण्विक युद्धाची देखील भाषा केली. मात्र याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी ”काश्मीर तर सोडाच आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा” असे म्हणत घरचा आहेर दिला आहे.
बिलावल यांनी पाकिस्तानी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पूर्वी आपण भारताला धमकावत होतो की, आपण त्यांच्याकडून काश्मीर हिसकावून घेऊ, मात्र या अपयशी सरकारमुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की आपल्यालाच मुजफ्फराबाद वाचवण्याची चिंता पडली आहे.

यावेळी बिलावल यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करावर टीका करत म्हटले की, इम्रान खान इलेक्टेड (जनतेद्वारे निवडलेले) नाही तर सलेक्टेड(लष्कराद्वारे निवडलेले ) पंतप्रधान आहेत. त्यामुळे देशातील जनता आता सलेक्टेड आणि सलेक्टर्सकडून जाब मागत आहे.
इस्लामाबादेत पाकिस्तान पीपल्स पार्टीची बैठक झाल्यानंतर बिलावल यांनी माध्यामांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, आता ही गोष्ट अतिशय स्पष्ट झाली आहे की, सध्याचे असलेले सरकार जेवढे अपयशी ठरले आहे, तेवढे या अगोदर कोणतेही सरकार अपयशी ठरले नव्हते. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना उद्देशून हे देखील म्हटले की, तुम्ही देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली आहे. तुम्ही इकडे आरामात झोपा काढत होता आणि तिकडे मोदींनी काश्मीर ताब्यात घेतले. पूर्वी आपले काश्मीर धोरण काय होते? आपण योजना आखत असत की, कशाप्रकारे श्रीनगर आपल्या ताब्यात घेतले जाईल? मात्र आता या सलेक्टेड पंतप्रधानामुळे अशी वेळ आली आहे की, भारतापासून मुजफ्फराबादला कसे वाचवता येईल याचा आपल्याला विचार करावा लागत आहे. मात्र सलेक्टेड पंतप्रधानाला देशातील जनतेशी काही देणेघेणे नाही, ते केवळ त्यांच्या सलेक्टर्सला खुश करण्यात मग्न आहेत. मग दुसरीकडे देश उद्धवस्त झाला तरी त्यांना काही देणे घेणे नाही.

देशातील जनता महागाईच्या सुनामीत बुडत आहे. काश्मीरही आपल्या हातून गेला आहे. आता हा प्रश्न निर्माण होतो की, कोणाला दोषी ठरावाव? सलेक्टेड व्यक्तीला की सलेक्टर्सला? देशातील कोणतेही क्षेत्र पहा प्रत्येक ठिकाणी पंतप्रधान इम्रान खान अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता आम्ही या दोघांनाही जाब विचारणार आहोत, असेही बिलावल यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 5:10 pm

Web Title: earlier we used to plan how to take srinagar now we are planning how to save muzaffarabad msr 87
Next Stories
1 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवा विझवण्यासाठी सरसावला कोकणी माणूस, ब्राझीलला दिला हा इशारा
2 “श्रीकृष्णासारखी बासरी वाजवली तर गाई जास्त दूध देतात”
3 धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मुंडन करत काढण्यात आली धिंड
Just Now!
X