सुनामी लाटांचा इशारा

दहा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
चिलीमध्ये ८.३ रिश्टरचा भूकंप झाला असून चिली, पेरू, फ्रेंच पॉलिसेनिया या देशातील रहिवाशांना सुनामीच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. चिली सरकारने किनाऱ्यावरील लोकांना हलवण्याचे आदेश दिले आहेत. इलापेलच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार या भूकंपात २६ वर्षांची एक महिला घर कोसळून मरण पावली. इतरत्र सात जण मरण पावले, तर इतर १५ जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे सँटियागोत वीज पुरवठा खंडित झाला असून पिण्याचे पाणीही बंद झाले आहे. लोक पडलेल्या घरातून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. एकू ण दहा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
भूकंपाचा हा धक्का अर्जेटिनाची राजधानी ब्यूनॉस आयर्स येथे जाणवला. अमेरिकेच्या भूगर्भ संरक्षण संस्थेने या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर असल्याचे सांगितले होते. त्याचा केंद्रिबदू वालपारायसोपासून १६९ कि.मी. अंतरावर होता व त्याची खोली २५ कि.मी. इतकी होती. तांब्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कोडेलको यांनी सांगितले की, व्हेंटाना येथील लॉस पेलामब्रेस खाणीतून कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. या भूकंपामुळे सागरी लाटा उंच उसळल्या असून किनारपट्टीजवळच्या रस्त्यांवर पाणी साचले आहे. पेरूमध्येही ३ फूट उंचीच्या लाटा उसळल्या. फ्रेंच पॉलिसेनिया येथेही १० फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवाई बेटांवर गुरुवारी लाटा उसळल्या. या भूकंपानंतर ६.१ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला. २०१० मध्ये चिलीत ८.८ रिश्टरचा भूकंप झाला होता त्यामुळे सुनामीत ५०० लोक मारले गेले होते.