जम्मू-काश्मीर आणि रजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांना बुधवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. तथापि, या भूकंपात जीवितत हानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आलेले नसले तरी दोन शाळांसह अन्य इमारतींचे किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
जम्मू-काश्मीरच्या भदेरवाह जिल्ह्य़ात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि रिश्टर स्केलवर त्याची क्षमता ५.८ इतकी नोंदविण्यात आली. पृष्ठभागाखाली १५ कि.मी. अंतरावर भूकंपाचे धक्के बसले, असे सांगण्यात आले. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा येथेही भूकंपाचे धक्के बसले. हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास ३० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्य़ातील काही भाग आणि भदेरवाह येथे मंगळवारी भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर त्याची क्षमता ४.३ इतकी होती. राजधानीत गेल्या १५ दिवसांत बसलेला भूकंपाचा हा तिसरा धक्का आहे. राजधानी, गुरगाव आणि नोइडा येथे २०-२५ सेकंद धक्के जाणवत होते.
काश्मीरमध्ये २ ठार, ६९ जखमी
मध्यम स्वरूपाच्या भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारताला हादरवले असून बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये इमारतींच्या पडझडीमुळे २ जण ठार झाले तर ३२ विद्यार्थ्यांसह ६९ जण जखमी झाले आहेत.
जम्मूतील किश्तवाड आणि दोडा या जिल्ह्य़ांना भूकंपाचा मोठा तडाखा बसला असून शाळा, रुग्णालये आणि घरांसह ४०० हून अधिक बांधकामांची पडझड झाली. या नैसर्गिक आपत्तीत २ जण ठार झाले तर ६९ जण जखमी झाले असून त्यामध्ये ३२ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.