शहरं, तीर्थक्षेत्रांची नावे बदलल्यानंतर आता मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याने चक्क एका मंत्रालयाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना आपल्या मंत्रालयाचे नाव भारत माता मंत्रालय करण्याची मागणी केली आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्रालयाचे नाव बदलून भारत माता मंत्रालय केल्यास माझा कोणताही आक्षेप नसेल, असे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या १४४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, हवामान विभागाचे सचिव एम राजीवन यांना जर आक्षेप नसेल तर भारत माता मंत्रालय नाव ठेवण्यात काहीच गैर नाही.

यावर जास्त विचार करण्याची गरज नाही.. याचे सादरीकरण करण्याचीही आवश्यकता नाही, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हर्षवर्धन यांनी मंत्रालयाच्या नाव बदलाची सूचना केली. या विभागाचे वैज्ञानिक हे पृथ्वी वाचवण्यासाठीच काम करत आहेत. पृथ्वी ही आपली भारत माता नाही का, आपण सगळेजण भारत माता म्हणत नाही का, असा सवाल त्यांनी केला. ते वारंवार आपल्या भाषणात भारत माता मंत्रालयाचा उल्लेख करत होते.