हुगळी व यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या भागास व विशेष करून दिल्ली, कोलकात्यास भूकंप झाल्यास मोठा फटका बसेल, असे सरकारने केलेल्या पाहणी अभ्यासात दिसून आले आहे.

दिल्लीला कमी ते मध्यम प्रमाणात भूकंपाचा धोका असून त्यात प्रतिष्ठित ल्युटेन्सचा समावेश आहे व दिल्ली विद्यापीठाचा उत्तरेकडील परिसर जास्त ते अति जास्त धोकादायक पातळीत येतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सिटी ऑफ जॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोलकाता येथे सॉल्ट लेक भागात तसेत हुगळी नदी किनारी भूकंपाचा जास्त धोका आहे, असे संशोधन अहवालात म्हटले असून दिल्ली व कोलकाता यांचा भूकंपाच्या दृष्टिकोनातून पृथ्वी विज्ञान खात्याने अभ्यास केला आहे. दोन्ही शहरात भूकंपाचा धोका किती प्रमाणात आहे याची माहिती त्यात दिली आहे. राजधानी क्षेत्रातील भूकंपप्रवण भाग हा विखुरलेला असून त्यात पूर्व, मध्य व उत्तर भाग येतो. गीता कॉलनी, सरिताविहार, शिकारपूर, पश्चिम विहार, वझीराबाद, उत्तर परिसर, रिथाळा, रोहिणी, जहांगीरपुरी, बवाना, करोल बाग व जनकपुरी जास्त जोखमीचे भाग आहेत ते बहुतांश यमुनेच्या किनारी येतात. हौज खास, बुरारी, नजाफगड, इंदिरा गांधी विमानतळ हे भागही जास्त जोखमीचे आहेत तर एम्स, वसंतकुंज, नरैना, जेएनयू परिसर, अशोक विहार ही सुरक्षित ठिकाणे मानली जातात ती कमी जोखमीची आहेत. आणखी तीस शहरांच्या भूकंप जोखमीचा अभ्यास केला जाणार असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातील असे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. खडकांचा प्रकार भूजलपातळी, मातीचा दर्जा व इमारतींवर भूकंपाचा परिणाम या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. दिल्ली हे चार क्रमांकाच्या भूकंप प्रवण भागात येते. दिल्ली हा भूकंपाचा स्रोत नाही पण तो भूकंपप्रवण भाग आहे कारण हिंदुकुश व हिमालय पर्वतरांगांत नेहमी उलथापालथी होतात. हिमालय दिल्लीपासून १८० कि. मी दूर आहे असे राष्ट्रीय भूकंप केंद्राचे संचालक विनीतकुमार गेहलोत यांनी सांगितले. अफगाणिस्तान व नेपाळमधील हिंदुकुशमध्ये भूकंप झाले तेव्हा हे दिसून आले आहे. भूकंपविषयक प्रकल्प संचालक बी.के.बन्सल यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीला भूकंपाचा फार मोठा धोका नाही पण तरी काही ठिकाणी जुनी घरे पाडून नवीन बांधली पाहिजेत किंवा दुरुस्त्या केल्या पाहिजेत. संबंधित संस्थांना हा अहवाल देण्यात येणार असून त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळू शकेल असे हर्षवर्धन यांनी सांगितले.