X

भूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का

25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.

बिहार आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि आसामला देखील भूकंपाचा धक्का बसला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास धक्के जाणवल्याची माहिती आहे. शेजारील देश बांगलादेशमधील रंगपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर 5.5 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. 25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली होती, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला होता. सुदैवाने भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.यापूर्वी आज पहाटेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. ३.१ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.

याशिवाय, १० सप्टेंबर रोजीही दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याशिवाय रविवारीही(९ सप्टेंबर) सायंकाळी ४.३७ वाजता दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. तसंच ६ सप्टेंबर रोजीही हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. . ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता.

First Published on: September 12, 2018 11:11 am