काश्मीरसह दिल्ली-एनसीआर येथे मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले आहेत. जगभरातील भूकंपाच्या धक्क्यांची माहिती ठेवणाऱ्या ईएमसी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का ५.६ रिश्टर स्केलचा होता. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार काश्मीर आणि आजूबाजूच्या परिसराला भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

मंगळवारी रात्री १० वाजून १७ च्या सुमारास हा धक्का बसला. धक्क्यांमुळे भयभीत झालेले लोक घराबाहेर पळाले. भूकंपाचे केंद्र जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून ११८ किमी अंतरावर उत्तर-पश्चिम दिशेकडे होता. यापूर्वी १० जानेवारी रोजीही जम्मू-काश्मीरमधील लडाख क्षेत्रात ४.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.

भूकंपामुळे जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीलाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे समजते. तीन दिवसांपूर्वी शनिवारी सांयकाळी दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे हलके धक्के बसले होते.