राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील विविध भागात मंगळवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे एका खासगी भूकंप निरिक्षण एजन्सीने स्पष्ट केले आहे. ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाच्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.

आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास नवी दिल्ली, चंदीगड, काश्मीर तसेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह खैबर पख्तून प्रांतासह काही शहरांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपीअन मेडिटेरनीन सिस्मोलॉजिकल सेंटरने याची माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या लाहोर प्रांतापासून उत्तर पश्चिम भागात १७३ किमी अंतरावर पीओकेत या भूकंपाचे केंद्र असल्याचे या एजन्सीने म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर दिल्ली जवळील नोयडा येथे राहणाऱ्या अन्यन्या भट्टाचार्य नावाच्या एका मुलीने तिच्या घरामधील वस्तूंची झालेली हालचाल कॅमेरॅत टिपली असून याचा व्हिडिओ तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे.