मध्य व पूर्व अमेरिकेत २००९ पासून भूकंपाचे प्रमाण वाढण्यामागे तेल व नैसर्गिक वायू शोधनात वापरण्यात येणाऱ्या द्रायू वाहक विहिरी हे कारण असल्याचा दावा नवीन अभ्यासात करण्यात आला आहे. या विहिरींमुळे १९७० च्या आसपास अगदी बोटावर मोजण्याइतके भूकंप होत असत पण २०१४ मध्ये ते ६५० पर्यंत पोहोचले, असे कोलॅरॅडो विद्यापीठाचे संशोधक मॅथ्यू वेनगार्टन यांनी म्हटले आहे. २०११ व २०१२ मध्ये तेल व नैसर्गिक वायूसाठीच्या द्रायू विहिरींमुळे ४.७ ते ५.६ रिश्टर तीव्रतेचे भूकंप प्राग, ओक्लाहोमा, त्रिनिदाद, कोलोरॅडो, थिम्पसन, टेक्सास व अरकान्सास येथे झाले होते.
वेनगार्टन यांनी म्हटले आहे, की तेलशोधनासाठीच्या द्रायू विहिरी व भूकंप यांचा संबंध पहिल्यांदाच अभ्यासण्यात आला आहे. या विहिरींमुळे २००९ पासून भूकंपाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यासाठीचे पुरावेही खात्रीलायक आहेत. तेल व नैसर्गिक वायूच्या शोधनासाठी या विहिरी खोदल्या जातात. अनेकदा अशा विहिरीतून तीन लाख बॅरल खराब पाणी महिन्याला जमिनीत घातले जाते; त्यामुळे अशा विहिरी ज्या भागात जास्त आहेत, तिथे भूकंपाचे प्रमाण जास्त असते. जास्त तेल मिळण्यासाठी या विहिरी खोदून त्यात द्रायू टाकला जातो, जिथे तेलाचे थर खाली गेले असतील, तेथे या विहिरी असतात. काही वेळा तेल व वायू निर्मितीतील क्षारयुक्त द्रायू काढण्यासाठीही या विहिरींचा वापर केला जातो. ज्या भागात हा अभ्यास करण्यात आला त्या कोलोरॅडो ते पूर्व किनारा भागात १ लाख ८० हजार विहिरी आढळल्या आहेत. त्यातील १८ हजार विहिरी या ओक्लाहोमा व टेक्सासमधील भूकंपाशी निगडित आहे. तेथे या विहिरी अजून सक्रिय आहेत. भूकंपाशी संबंधित विहिरी ६६ टक्के आहेत, असे प्रा शेमीन गे यांचे मत आहे पण क्षारयुक्त पाण्याच्या विहिरींचे प्रमाण तेल काढण्याच्या विहिरींपेक्षा दीडपट अधिक आहे व त्या विहिरी भूकंपाशी निगडित आहेत. तेल शोधन विहिरीबंरोबर द्रायू विहिरी असतात. त्यामुळे द्रायू विहिरीत खराब पाणी टाकले, की तेल दुसऱ्या रिकाम्या विहिरीत जाते व तेथून ते काढले जाते. जास्त दाब निर्माण करण्यासाठी यात द्रायूचा वापर केला जातो.
हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग व फ्रॅकिंग अशा आणखी दोन प्रकारच्या विहिरीही तेल उत्पादनात वापरल्या जातात. त्यांच्यापेक्षा द्रायू विहिरी वेगळ्या असतात, फ्रॅकिंग विहिरींमध्ये काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी द्रायू टाकला जातो.

विहिरी आणि  भूकंपात वाढ
गेल्या काही दशकात मध्य व पूर्व अमेरिकेत द्रायू भरण विहिरींचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे भूकंपही वाढले आहेत. कमी काळासाठी द्रायुभरण केल्या जाणाऱ्या विहिरीत द्रायू दाबाने भरला जातो. त्यामुळे त्यांचा भूकंपाशी जास्त संबंध असतो असे वेनगार्टन यांचे मत आहे. ‘सायन्स’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.