पाकिस्तान हादरा; एकाचा बळी, तीव्रता ७.१ रिश्टर स्केल
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या अनेक भागांना रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर ६.८ इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत होते. या भूकंपात जीव किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्येही रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली.
गुजरातमधील नांदवी शहरात केंद्र असलेल्या भूकंपाचे धक्के दक्षिण गुजरातमधील सुरत व तापी जिल्ह्य़ांनाही बसले, मात्र यातही कुठलीच हानी झाली नाही.
रिश्टर स्केलवर ६.८ इतकी नोंद झालेल्या आणि जमिनीच्या १९० किलोमीटर खोलवर केंद्र असलेल्या भूकंपाने हिंदुकुश पर्वतरांगांना दुपारी ३ वाजून ५८ मिनिटांनी हादरा दिल्याचे नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजीचे ऑपरेशन्स हेड जे.एल. गौतम यांनी सांगितले.या भूकंपाचे धक्के पाकिस्तानमध्ये, तसेच जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदिगड, हरयाणा व दिल्लीसह उत्तर भारताच्या बऱ्याच मोठय़ा भागांत जाणवले. रविवारच्या सुटीच्या दिवशी दुपारी भूकंपाचा हादरा बसल्याने लोक घाबरून घराबाहेर आले. भूकंपामुळे दिल्लीची मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली होती.