मध्यम तीव्रतेच्या भूकंपाने आसामला बुधवारी दिलेल्या धक्क्यानंतर रात्रभरात राज्यात भूकंपाचे अनेक धक्के जाणवल्यामुळे लोकांना रात्र दहशतीखाली काढावी लागली. या भूकंपात इमारती व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी सायंकाळी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तेजपूरला हादरा दिला. यानंतर या जिल्ह्याला, तसेच मध्य आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या लगतच्या भागांना भूकंपाचे आणखी ८ धक्के जाणवले. या सर्वांचा उगम तेजपूर आणि लगतच्या भागांतून झाला होता, असे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने  अधिकृत निवेदनात सांगितले. यापैकी सर्वात मोठा धक्का मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी बसला व त्यामुळे लोक भीतीने घाबरून घराबाहेर पळाले. यानंतर २.८, २.६, २.९, २.३, २.७, २.७ व २.८ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनुक्रमे रात्री ९.३८ वाजता, मध्यरात्री १२.२४, १.१०, १.४१, १.५२, २.३८ वाजता आणि सकाळी ७.१३ वाजता जाणवले, असेही एनसीएसने सांगितले. या भूकंपाचे धक्के संपूर्ण ईशान्य भारत, बंगालचा काही भाग, भूतान व बांगलादेशातही जाणवले.