करोनाचं संकट घोंगावत असताना राजधानी दिल्लीला रविवारी भूकंपाचे हादरे बसले. दिल्ली आणि एनसीआरमध्ये कंपने जाणवली. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ३.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेनं हे धक्के जाणवले.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे पूर्व दिल्लीत भूकंपाचा केंद्रबिदू होता. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर मालमत्तेचं कुठल्याही प्रकारची नुकसान झालं नसल्यांच ‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनीही यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ‘रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

… तर प्रचंड जीवितहानी झाली असती –

सध्या करोनामुळे देशभरात लॉकडाउन असून, लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. सगळ्यांनाच घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळे घरात आहेत. अशा वातावरणात दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले. सुदैवानं भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, भूकंपाची तीव्रता जास्त असती, चेंगराचेंगरीच्याही घटना घडल्या असत्या.